Chhagan Bhujbal | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून 29 ऑगस्टला मुंबईत दाखल होणार असल्याची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देत, मागण्या मान्य न झाल्यास मुंबई सोडणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जरांगेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली.
भुजबळ म्हणाले, “आंदोलन जालन्यात कर, अंतरवली सराटीत कर, मुंबईत कर किंवा दिल्लीत कर—त्याला कोण आडवतंय? पण आंदोलन नियमांच्या चौकटीतच करा.” त्यांनी संविधानाने दिलेले अधिकार मान्य असल्याचे सांगितले, मात्र ‘कुरघोडी’ करू नये असा इशाराही दिला. मराठा समाजाला देता आले ते आरक्षण दिले असल्याचे त्यांनी ठसवले, तसेच ओबीसी आरक्षणात घुसखोरी झाली तर गप्प बसणार नाही, अशी भूमिका मांडली.
जरांगेंच्या आंदोलनावर भुजबळांची प्रतिक्रिया
भुजबळांनी (Chhagan Bhujbal) स्पष्ट केलं की उपोषण, भाषण, शांततापूर्ण आंदोलन करण्याचे अधिकार सर्वांना आहेत; तथापि सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग, कायदा-सुव्यवस्थेला बाधा अशा प्रकारांना सरकार कधीही प्रोत्साहन देणार नाही. “दहशतीचं वातावरण नको; संवादाने तोडगा काढू,” असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने केलेल्या पावलं त्यांनी मांडली आणि प्रश्न केला, “आणखी काय पाहिजे?” ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुणी गदा आणू पाहत असेल, तर त्याला ठाम विरोध केला जाईल, असा संदेशही त्यांनी दिला. त्यामुळे 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
Chhagan Bhujbal | सुरज चव्हाण नियुक्ती :
पक्षातील सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या नियुक्तीबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, त्यांच्या समोर चव्हाण यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली गेली आहे. “त्यांनी अनेक वर्ष पक्षात काम केले, चूक मान्य करून माफी मागितली आहे. म्हणून कायमस्वरूपी दूर ठेवणे योग्य नाही,” असे भुजबळांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणावरील चर्चेलाही त्यांनी उत्तर दिले. नाशिकऐवजी गोंदिया येथे जबाबदारी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिकमधील पक्ष कार्यालयात ध्वजवंदन केले. “ध्वजारोहण कुठेही करा, आपला झेंडा एकच आहे. वंदन कुठे केले याने देशभक्तीचे महत्त्व कमी होत नाही,” असे म्हणत त्यांनी हा विषय संपवण्याचे आवाहन केले.






