Maharashtra | आमदार निवासातील हल्ला प्रकरणातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्याविरोधात आज विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात विरोधकांनी “चड्डी बनियन गँग हाय हाय”, “गुंडाराजचं करायचं काय?”, “खाली डोकं वर पाय” अशा घोषणा देत महायुती सरकारवर सडकून टीका केली.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सतेज पाटील (satej patil) यांच्यासह नेते टॉवेल आणि बनियन घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरले होते. संजय गायकवाड यांच्या कृतीचा निषेध करत, त्यांनी शासनाच्या “गुंडशाही कारभाराविरोधात” संतप्त घोषणाबाजी केली.
बॅनर्स आणि घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला :
या आंदोलनात “महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो” असा बॅनर लावण्यात आला होता, तर संजय गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतारमधील फोटो देखील ठळकपणे लावण्यात आला होता. विरोधकांनी हे आंदोलन विनोदी अंगाने सादर करत सरकारची निर्भत्सना केली.
संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी आमदार निवासात चड्डी बनियन घालून डॉक्टरला मारहाण केली होती, त्या घटनेवरून आता संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. एबीपी माझाने सर्वप्रथम या घटनेचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अजून अटक झालेली नाही.
Maharashtra | विरोधी पक्षनेते पद रिक्त, अधिवेशनात गोंधळ संभवतो :
सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असून, त्यात विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे, यामुळे आज दिवसभरात अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याची रणनीती अवलंबली आहे.
“ही लज्जास्पद घटना सरकारच्या भोंगळ कारभाराचे द्योतक आहे. जर सत्ताधारी आमदार असे वागत असतील, तर सामान्य माणसाला न्याय कुठून मिळणार?” असा सवालही विरोधी आमदारांकडून उपस्थित करण्यात आला.






