Ketan Agrawal Case | केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्याप्रकरणात तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, सिया (Siya) आणि चेतन (Chetan) यांनी केतनला मार्गातून दूर करण्यासाठी आधी वेगळाच कट आखल्याचा दावा केला जात आहे.
हत्या करण्याचा कथित कट रचला :
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांना एकत्र आयुष्य जगायचे असल्याने सियाचा होणारा पती केतन त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याला थेट संपवण्याऐवजी हळूहळू विष देऊन त्याची हत्या करण्याचा किंवा गंभीर शारीरिक इजा पोहोचवण्याचा कथित कट रचण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
तसेच केतनच्या दैनंदिन खाण्या-पिण्यातून स्लो पॉयझन देण्याची योजना आखण्यात आली होती. या माध्यमातून त्याच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी व्हावेत आणि त्याचा मृत्यू व्हावा, असा कथित हेतू असल्याचे समोर आले आहे. तसेच मृत्यू झाला नाही, तर तो कायमस्वरूपी अपंग व्हावा, अशीही आरोपींची कथित योजना असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
Ketan Agrawal Case | विष न मिळाल्याने योजना फसल्याचा दावा :
तपासातील माहितीनुसार, या कथित योजनेसाठी स्लो पॉयझन मिळवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. विविध ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला, मात्र संबंधित विष मिळवण्यात यश आले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा प्लॅन प्रत्यक्षात आणता आली नाही आणि त्यांचा हा कथित कट अयशस्वी ठरल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींचा उद्देश केवळ हत्या करणे नसून केतनला अत्यंत वेदनादायी मृत्यू किंवा आयुष्यभरासाठी अपंगत्व आणण्याचा होता, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व पैलूंची सध्या पोलीस सखोल चौकशी करत असून, तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आरोपांची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू असून अंतिम निष्कर्ष येणे बाकी आहे.






