Budget 2026 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प २०२६ (Union Budget 2026) सादर केला असून, ही त्यांची सलग नववी वेळ आहे. या घोषणांमुळे बाजारातील अनेक वस्तूंवर प्रत्यक्ष परिणाम होणार असून काही उत्पादने सामान्यांच्या आवाक्यात येतील, तर काही चैनीच्या वस्तूंसाठी अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे. या वित्तीय आराखड्यामुळे रोजच्या जीवनातील कोणत्या गोष्टींच्या किमतीत बदल झाला आहे, याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे.
कोणत्या गोष्टी स्वस्त?
सरकारने काही विशिष्ट क्षेत्रांमधील सीमा शुल्कात (Customs Duty) कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता कमी दरात उपलब्ध होतील. विशेष म्हणजे पादत्राणे अर्थात बूट (Shoes) आणि बीडी (Bidi) स्वस्त होणार असल्याने संबंधित ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तसेच पर्यावरणापूरक इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सीएनजी (CNG) आणि बायोगॅस (Biogas) स्वस्त करण्याची तरतूद करण्यात आली असून बॅटरी (Battery) आणि ओव्हन (Oven) सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीही खाली येणार आहेत.
आरोग्य सेवा स्वस्त करण्यावर भर देताना सरकारने मधुमेह (Diabetes) आणि इतर सात गंभीर आजारांवरील औषधांच्या दरात कपात केली आहे. याव्यतिरिक्त, चामडे आणि कापड निर्यात (Textiles Export) सुलभ करण्यात आली असून मच्छिमारांसाठी निर्यातीचे दर कमी झाले आहेत. शिक्षण आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी परदेशातील शिक्षण (Education Abroad) आणि आंतरराष्ट्रीय प्रवास (Foreign Travel) देखील आता स्वस्त होणार आहे.
मद्य आणि धूम्रपान शौकिनांना महागाईचा झटका-
दुसरीकडे, सरकारने काही वस्तूंवर अधिक कर लादल्याने त्यांच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेषतः मद्य (Alcohol) आणि सिगारेट (Cigarettes) प्रेमींना आता अधिक खर्च करावा लागणार आहे, कारण या वस्तूंवरील करात वाढ करण्यात आली आहे. महसूल वाढवण्यासाठी आणि आरोग्यास हानिकारक उत्पादनांचा वापर मर्यादित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे दिसते.
तसेच औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या काही कच्च्या मालावरही याचा परिणाम झाला आहे. खनिजे (Minerals) आणि स्क्रॅप (Scrap) महागल्यामुळे संबंधित निर्मिती उद्योगांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरवाढीमुळे बांधकामे किंवा उत्पादनांच्या खर्चावर परिणाम होऊ शकतो, मात्र दुसरीकडे सीमा शुल्कातील सवलतींमुळे सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पातून केला आहे.
News Title – Budget 2026 Price List Of Cheaper And Costly Items






