Pune Municipal Corporation | पुणे शहरातून एक गंभीर आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) मुख्यालय आणि महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेनंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीतील कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले असून परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
धमकीनंतर महापालिका इमारत रिकामी :
महापालिकेच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा संदेश प्राप्त होताच प्रशासनाने त्वरित हालचाली सुरू केल्या. महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांच्या निर्देशानुसार संपूर्ण मुख्य इमारत रिकामी करण्यात आली. कर्मचारी आणि अधिकारी यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतीबाहेर हलवण्यात आले असून सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत महापालिका परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला असून प्रत्येक मजला, विभाग आणि संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतरच महापालिकेचे नियमित कामकाज पुन्हा सुरू होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Pune Municipal Corporation | सायबर तपासाला वेग :
धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली आहे. हा प्रकार केवळ खोडसाळपणातून घडवण्यात आला आहे की यामागे आणखी काही गंभीर कारण आहे, याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत. सध्या तपासाच्या विविध अंगांचा विचार करून संबंधित तांत्रिक माहिती गोळा केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पुणे (Pune) शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या विविध घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा सुरू असताना या नव्या धमकीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.






