BMC Election 2026 | महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. विविध राजकीय पक्षांकडून या शाईवर आक्षेप घेत दुबार मतदानाची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, राज्य निवडणूक आयोगाकडून यावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
या प्रकरणावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी माध्यमांसमोर येऊन आरोप फेटाळून लावले आहेत. मतदानासाठी वापरली जाणारी शाई काढता येत नाही आणि याबाबत संभ्रम पसरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून, दुबार मतदान शक्यच नसल्याचा ठाम दावा आयुक्तांनी केला.
‘२०११ पासून एकाच कंपनीची शाई वापरतोय’; आयुक्तांचा दावा :
दिनेश वाघमारे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी ज्या शाईचा वापर करतो, तीच शाई महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरली जात आहे. ही शाई एकदा सुकल्यानंतर पुसता येत नाही. २०११ पासून सातत्याने एकाच कंपनीचा मार्कर पेन वापरात असून, यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यानही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या होत्या, मात्र त्या वेळीही शाईबाबत कोणतीही त्रुटी आढळली नव्हती. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीत मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं. (Dinesh Waghmare Statement)
BMC Election 2026 | दुबार मतदानावर कडक नजर; मुंबईत दोन ओळखपत्रांची सक्ती :
दुबार मतदानाच्या आरोपांवर बोलताना दिनेश वाघमारे म्हणाले की, एकदा मतदान केल्यानंतर पुन्हा मतदानासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख न पटल्यास त्याला मतदान करू दिलं जात नाही. मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक उपस्थित असतात, त्यामुळे कोणताही गैरप्रकार लपून राहणं शक्य नाही. (BMC Election 2026)
मुंबईत तर विशेष दक्षता घेतली जात असून, काही ठिकाणी मतदारांकडून दोन ओळखपत्रांची तपासणी केली जात आहे. माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मतदान केलं असून, त्यांच्या बोटावरील शाई अजूनही स्पष्ट आहे, असा दाखला देत आयुक्तांनी शाई पुसली जाते हा दावा खोटा असल्याचं पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं.
News Title: BMC Election 2026: Voting Ink Controversy; State Election Commissioner Dinesh Waghmare Clarifies Allegations
मतदान शाई वाद, महानगरपालिका निवडणूक 2026, दिनेश वाघमारे, दुबार मतदान आरोप, BMC Election
BMC Election 2026, Voting Ink Controversy, Dinesh Waghmare Statement, Double Voting Allegation






