BJP and MIM Alliance | राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महापौरपदासाठी राजकीय हालचाली वेगात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि एमआयएम (MIM) या परस्परविरोधी विचारसरणीच्या पक्षांमध्ये थेट युती झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली असून अनेक ठिकाणी सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. (BJP and MIM Alliance)
दरम्यान, काही महापालिकांमध्ये एमआयएमनेही प्रभावी कामगिरी करत राजकीय समीकरणे बदलली आहेत. विरोधकांकडून एमआयएमला भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे आरोप करण्यात येत होते. मात्र, आता अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम थेट एकत्र आल्याने या आरोपांना नवे बळ मिळाले आहे.
अचलपूर नगरपरिषदेत अनपेक्षित घडामोड :
अचलपूर नगरपरिषदेत (Achalpur Nagarparishad) समिती सभापतीपदासाठी भाजप आणि एमआयएमने परस्परांना साथ दिली आहे. या युतीत एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचे सभापतीपद देण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणातच नव्हे तर राज्यपातळीवरही चर्चांना उधाण आले आहे.
या घडामोडीत एमआयएमचे तीन, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे दोन आणि तीन अपक्ष नगरसेवक भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेत सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले असून विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
BJP and MIM Alliance | राज्यभर राजकीय चर्चांना उधाण :
एमआयएम आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या विचारधारा पूर्णपणे वेगळ्या असल्याने हे समीकरण अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे. याआधी दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशी शक्यता फार कमी मानली जात होती. मात्र, अचलपूरमधील प्रत्यक्ष युतीमुळे भविष्यात इतर ठिकाणीही अशीच राजकीय गणिते बदलू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
महापालिका आणि नगरपरिषदांमधील सत्ता स्थापन करताना पक्ष स्वार्थी गणिते मांडत असल्याचे चित्र या घटनेतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही अशा अनपेक्षित युती दिसण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.






