Suresh Dhas vs Pankaja Munde | बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) दोन दिग्गज नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर थेट आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. (Suresh Dhas vs Pankaja Munde)
सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर टीका करताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पदावर असताना त्या गप्प का होत्या, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर पंकजा मुंडेंनीही प्रत्युत्तर देत धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, अशी मागणी केली.
पंकजा मुंडेंचा कॅमेरावरून टोला
एका मुलाखतीत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे सुरेश धस यांच्यावर निशाणा साधत विचारलं की, “सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या नेत्यांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली?” यावर उत्तर देताना धस म्हणाले, “कॅमेरे माझ्या मागे येतात, कुठे जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही.”
“संतोष देशमुख प्रकरण मी थांबवणार नाही”
पंकजा मुंडेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरेश धस यांना समज द्यावी, अशी मागणी केली. त्या म्हणाल्या, “मी राष्ट्रीय नेत्या असूनही माझ्यावर आरोप केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावर लक्ष द्यावे.”
यावर धस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “संतोष देशमुख भाजपचा बुथ प्रमुख होता, त्यामुळे मी हे प्रकरण सोडणार नाही.” तसेच, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना मी आमदार होतो, त्यावेळी तक्रार केली नाही, हा आरोप चुकीचा आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Suresh Dhas vs Pankaja Munde)
सुरेश धस यांनी आता पक्षाकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. “मी आतापर्यंत तक्रार केली नव्हती, पण आता वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार आहे,” असं धस म्हणाले. त्यामुळे या वादामुळे भाजपमध्ये अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे.
‘माझं नाव विनाकारण घेतलं जातंय’
सुरेश धस यांनी लेखी तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया देत म्हटलं, “माझ्या नावाचा विनाकारण वापर केला जात आहे. पक्षश्रेष्ठींनी यावर लक्ष द्यावं आणि धस यांना समज द्यावी.” त्या पुढे म्हणाल्या, “मी प्रचार केला नसता, तर सुरेश धस निवडून आले असते का?” दरम्यान हा वाद भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा परिणाम आहे का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Title : BJP Leaders Clash Suresh Dhas vs Pankaja Munde






