Rama Nishad | बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने मोठे यश मिळवून 243 पैकी तब्बल 203 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालानंतर नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) उपस्थितीत इतर मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. या नव्या मंत्रिमंडळातील एक नाव सध्या विशेष चर्चेत आहे ते म्हणजे रमा निषाद. कारण त्यांची संपत्ती मुख्यमंत्री नितीश कुमारांपेक्षा तब्बल 30 पट जास्त आहे.
रमा निषाद (Rama Nishad) या मुजफ्फरपूरच्या औराई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या नेत्या असून त्यांना या वेळी मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. निवडणूक अर्जात दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 31.86 कोटी रुपये आहे. त्यामुळे त्या बिहारमधील “गर्भश्रीमंत मंत्री” म्हणून चर्चेत आहेत.
रमा निषाद यांची संपत्ती नितीश कुमारांच्या 30 पट :
रमा निषाद (Rama Nishad) यांच्या संपत्तीत 6 कोटी 5 लाख रुपये चल संपत्ती तर 25 कोटी 8 लाख रुपये अचल संपत्ती समाविष्ट आहे. त्यांच्यावर 75 लाख रुपयांचे कर्ज असल्याचेही अर्जात नमूद आहे. दुसरीकडे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवडणूक विवरणानुसार त्यांची एकूण संपत्ती 1 कोटी 64 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे थोडीफार रोख रक्कम असून बाकी रक्कम बँक खात्यांमध्ये जमा आहे. त्यांच्या संपत्तीतील मोठा भाग हा अचल मालमत्तेचा आहे.
यामुळे रमा निषाद या मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या तुलनेत संपत्तीच्या बाबतीत 30 पट आघाडीवर आहेत. हे गणित समोर आल्यानंतर त्यांचे नाव राज्यभरात चर्चेत आले आहे. बिहारच्या नवीन मंत्रिमंडळातील सर्वाधिक श्रीमंत नेत्यांपैकी त्या एक असून त्यांची भूमिका आगामी काळात किती प्रभावी ठरेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Rama Nishad | राजकीय घराणे, सामाजिक कार्य आणि मजबूत जनाधार :
58 वर्षीय रमा निषाद या गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांच्या पती अजय निषाद हेही भाजपचे वरिष्ठ नेते असून 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. दोन्ही पती-पत्नी राजकारणात सक्रिय असल्याने त्यांच्या कुटुंबाची ओळख संपूर्ण जिल्ह्यात ठोस आहे.
निषाद दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा असून संपूर्ण कुटुंब सामाजिक कामातही सहभागी असते. त्यामुळे रमा निषाद यांचा मतदारांशी घनिष्ठ संपर्क राहिला आहे. मजबूत जनाधार, सातत्यपूर्ण काम आणि संघटनातील पकड या आधारावरच त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचे मानले जाते. मात्र त्यांच्या नावावर 2 गुन्हेगारी खटल्यांची नोंदही असल्याची माहिती निवडणूक दस्तऐवजांतून समोर आली आहे.
कार्यपद्धतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष :
दरम्यान, बिहारच्या नवीन मंत्रिमंडळात इतर श्रीमंत मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री विजय सिन्हा (11.62 कोटी) आणि सम्राट चौधरी (11.34 कोटी) यांचा समावेश आहे. मात्र रमा निषाद (Rama Nishad wealth) यांच्या 31.86 कोटींच्या एकूण संपत्तीसमोर इतर सर्व मंत्री फार मागे पडतात.
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर बिहारमध्ये आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठे निर्णय घेण्यात येतील अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत गर्भश्रीमंत आणि प्रभावशाली नेत्या म्हणून रमा निषाद यांच्या कार्यपद्धतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






