Shiv Thackeray Marriage | मराठी बिग बॉसचा विजेता आणि ‘बिग बॉस 16’चा फर्स्ट रनरअप अभिनेता शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण एखादा शो किंवा प्रोजेक्ट नसून थेट त्याचं लग्न आहे. शिव ठाकरेने सोशल मीडियावर अचानक एक फोटो शेअर करत चाहत्यांना मोठा सरप्राईज दिला आहे. (Shiv Thackeray Marriage)
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये शिव ठाकरे पारंपरिक मराठमोळ्या वराच्या वेशात मुंडावळ्या बांधून विवाहमंडपात उभा दिसतो. विशेष म्हणजे या फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नीही आहे, मात्र तिचा चेहरा दिसत नाही. ‘Finally’ असं कॅप्शन देत शिवने ही पोस्ट शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
‘Finally’ पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांचा पाऊस :
फोटोमध्ये लग्नाची सजावट, विधींचं वातावरण आणि नातेवाईक स्पष्ट दिसत असल्याने अनेक चाहत्यांनी शिवच्या लग्नावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं आहे. पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शिववर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “हे कधी झालं?” अशी आश्चर्य व्यक्त करणारी प्रतिक्रिया भारती सिंहने दिली, तर विक्की जैन, आकांक्षा पुरी, ऐश्वर्या शर्मा आणि जेमी लिव्हर यांनीही अभिनंदन केलं. (Shiv Thackeray Marriage)
मात्र काही चाहत्यांनी या फोटोवर शंका उपस्थित केली आहे. “हे खरंच लग्न आहे की एखाद्या शूटिंगचा भाग?” असा सवाल अनेकांनी विचारला आहे. काही युजर्सनी हा फोटो एखाद्या आगामी प्रोजेक्टसाठी असल्याचा अंदाज व्यक्त केला असून, एप्रिल फूलच्या पार्श्वभूमीवर मिश्किल प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहेत.
Shiv Thackeray Marriage | संघर्षातून स्टारडमपर्यंतचा शिव ठाकरेचा प्रवास :
शिव ठाकरेचा जन्म १९८९ साली अमरावती येथे झाला. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या शिवने लहानपणी दूध आणि वर्तमानपत्रं विकत कुटुंबाला हातभार लावला. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने मनोरंजनसृष्टीत स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं. (Bigg Boss Marathi Winner Wedding)
‘एमटीव्ही रोडीज रायझिंग’मधून त्याने ओळख मिळवली आणि ‘बिग बॉस मराठी सीजन 2’ जिंकून तो घराघरात पोहोचला. पुढे ‘बिग बॉस 16’चा फर्स्ट रनरअप ठरला आणि ‘खतरों के खिलाडी 13’मध्येही सहभाग घेतला. अभिनयासोबतच शिवने व्यवसायातही यश मिळवत चहा-स्नॅक्स रेस्टॉरंट आणि ‘B.Real’ हा डिओडोरंट ब्रँड सुरू केला आहे. सोशल मीडियावर त्याचे तब्बल 2.1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.






