Ladki Bahin Yojana | राज्यातील अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हफ्ते अनियमित झाल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी होती. विशेषतः जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने अनेक महिला प्रतीक्षेत होत्या. (January Installment Update)
या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे आणि प्रशासकीय कारणांमुळे काही महिन्यांपासून निधी वितरणात विलंब झाला. आता जानेवारी महिना संपून फेब्रुवारी अखेर येत असतानाही हप्ता न मिळाल्याने प्रश्न उपस्थित होत होते.
निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू :
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या हफ्त्यासाठी सरकारने निधी उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या खात्यातून तब्बल 98.25 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ladki Bahin Yojana News)
सरकारकडून निधी वर्गीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याने पुढील काही दिवसांत जानेवारीचा प्रलंबित हप्ता जमा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana | केवायसीबाबतही दिलासा :
दरम्यान, अनेक महिलांनी केवायसी (E-KYC) पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नव्हती. काही प्रकरणांमध्ये केवायसी प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर सरकारने केवायसी अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित महिलांनी आपली केवायसी माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे निधी वितरणावर परिणाम झाला होता. मात्र आता निवडणुका पार पडल्याने प्रलंबित रक्कम लवकरच वितरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजना पुन्हा नियमितपणे सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






