Congress | विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला सपाटून पराभव अजूनही सावरायचा आहे, तोच गळतीचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते अनुक्रमे भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागल्यानंतर महायुतीने बहुमत मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. अशातच काँग्रेसला सलग मिळणारे धक्के पक्षाच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडवत आहेत.
नवीन घडामोडीत, अमरावती जिल्ह्यातील वरुड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे (Nareshchandra thakare) यांचे सुपुत्र विक्रम ठाकरे आज हजारो समर्थकांसह भाजपात प्रवेश करत आहेत. हा कार्यक्रम भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या वेळी खासदार अनिल बोंडे आणि आमदार उमेश यावलकरही उपस्थित राहणार आहेत. विक्रम ठाकरे यांनी अलीकडेच अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती.
जळगावातही काँग्रेसला मोठा धक्का :
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातही काँग्रेसला मोठी गळती बसत आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे (Pratibha shinde) या आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. यावेळी तब्बल 20 ते 25 हजार आदिवासी कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे. हा भव्य कार्यक्रम जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
प्रतिभा शिंदे (Pratibha shinde) यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पदावर असूनही काम करता येत नसल्याची खंत व्यक्त केली होती. आता त्या थेट राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत असल्याने स्थानिक पातळीवरील काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर मोठा परिणाम होणार आहे.
Congress | निवडणुकांपूर्वीची रणनीती
राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याआधीच महायुतीकडे गळतीचे राजकारण हे एक मोठे शस्त्र म्हणून पाहिले जात आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षांनी विविध जिल्ह्यांमधून प्रभावी नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावून निवडणुकीपूर्वीची तयारी वेगवान केली आहे.
काँग्रेससाठी मात्र हा काळ चिंतेचा आहे. सलग पराभव आणि सततची गळती यामुळे पक्षाचे मनोबल खालावत असून, आगामी निवडणुकांत कार्यकर्त्यांची उणीव भासण्याची भीती व्यक्त होत आहे.






