Raj Thackeray | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे प्रभावी नेते आणि कल्याण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर (Prakash bhoir) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून यामुळे मनसेच्या राजकीय समीकरणात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांत महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असताना हा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा राजीनामा :
राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. यावेळी पक्ष बांधणी, नेत्यांचे मजबूत जाळे आणि बूथ स्तरावरील तयारी यांना विशेष महत्त्व असते. अशा स्थितीत प्रकाश भोईर यांनी दिलेला राजीनामा मनसेसाठी चिंताजनक ठरला आहे.
कल्याण ग्रामीण परिसरात प्रकाश भोईर (Prakash bhoir) यांची मजबूत संघटनात्मक पकड होती. त्यांच्या नेतृत्वात मनसेने अनेक राजकीय उपक्रम राबवले होते. मात्र आता त्यांनी राजीनामा दिल्याने मनसेची स्थानिक शक्ती कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Raj Thackeray | भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा का वाढली? :
गेल्या आठवड्यात कल्याणमधील एका भूमिपूजन कार्यक्रमात प्रकाश भोईर हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत एकाच मंचावर दिसले होते. यावेळी चव्हाण यांनी केलेल्या ‘लवकरच भोईर वंदे मातरम म्हणतील’ या वक्तव्यानंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा अधिक गडद झाल्या.
माध्यमांनी विचारणा केली असता भोईर यांनी “कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार” असे म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी राजीनामा देत मनसेप्रती निष्ठा सोडण्याचे संकेत दिले आहेत.
राजकीय वर्तुळात मिळालेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी प्रकाश भोईर भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. याबाबत मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे.
मनसेला धक्का, भाजपला बळ :
जर प्रकाश भोईर भाजपमध्ये दाखल झाले, तर भाजपची कल्याण ग्रामीण भागातील ताकद वाढेल. याशिवाय मनसेची स्थानिक संघटनात्मक रचना कमकुवत होईल. तसेच भाजप त्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊ शकते.
याशिवाय महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपला एक अनुभवी आणि प्रभावी स्थानिक नेता मिळाल्याने त्यांचे समीकरण आणखी मजबूत होऊ शकते.






