Bharat Taxi Launch | पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. चालकांच्या मालकीची आणि सहकारी तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) सेवा आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. या सेवेमुळे निश्चित भाड्यात प्रवासाची सुविधा मिळणार असून, पावसाळा किंवा गर्दीच्या काळात वाढणाऱ्या कॅब भाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याचा दावा करण्यात आला आहे.
चालकांना झिरो कमिशन, प्रवाशांना निश्चित दर :
ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या ॲप-आधारित कॅब सेवांमधील वाढत्या भाड्याच्या पार्श्वभूमीवर ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) हा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. चाचणी टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर ही सेवा आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ॲपद्वारे सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमात चालकांकडून कोणतेही कमिशन आकारले जाणार नसल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या सेवेसाठी आतापर्यंत सुमारे 35 हजार चालकांनी नोंदणी केली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTO) यांच्या नियमांचे पालन करून तसेच चालक संघटनांशी चर्चा केल्यानंतरच भाडेदर निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे इतर कॅब सेवांप्रमाणे सर्ज प्राइसिंग लागू न करता दिवसभर निश्चित दर ठेवण्यात आले आहेत. केवळ सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत मूळ भाड्यावर 10 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
Bharat Taxi Launch | पुणे-मुंबई सेवेसह इतर शहरांपर्यंत विस्तार :
पुणे शहरासाठी जाहीर करण्यात आलेल्या दरांनुसार ऑटो-रिक्षाचे भाडे 18 रुपये प्रति किलोमीटर, मोटारसायकल 24 रुपये प्रति किलोमीटर, सेडान कॅब 25 रुपये प्रति किलोमीटर आणि एसयूव्हीसाठी 32 रुपये प्रति किलोमीटर निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय पुणे ते मुंबई आंतरशहरी सेवेसाठी हॅचबॅकचे भाडे 21 रुपये, सेडानचे 23 रुपये आणि एसयूव्हीचे 30 रुपये प्रति किलोमीटर निश्चित करण्यात आले आहे. पुणे विमानतळ येथे प्रवाशांसाठी विशेष बूथ सुरू करण्याबाबत विमानतळ प्रशासनाशी चर्चा सुरू असून ही सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
यापुढे पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर आणि पुणे-कोल्हापूर या मार्गांवरही आंतरशहरी सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खासगी कॅब कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या वाढीव भाड्याला पर्याय म्हणून ही सेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. निश्चित दराचे मॉडेल आणि चालकांच्या मालकीची रचना यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि परवडणारी प्रवास सेवा मिळेल, असा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे.






