Petrus Gaikwad Controversy | बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या वेळीही नाव समोर येतंय ते म्हणजे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड (Petrus Gaikwad) यांचं. कैद्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बीडच्या जिल्हा कारागृहात सध्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याचा साथीदार तुरुंगवास भोगत आहेत. याच जेलमध्ये कैद्यांवर मानसिक आणि शारीरिक छळ करून धर्म बदलण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी केला आहे. त्यांच्या मते, “कैद्यांच्या धर्मांतरासाठी दबाव आणला जात आहे, आणि विरोध करणाऱ्यांना शिक्षा दिली जाते.”
पेट्रस गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप :
वकील राहुल आघाव यांनी चार कैद्यांच्या लेखी तक्रारीच्या आधारे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, “तीन हिंदू आणि एक मुस्लिम कैद्याला धर्म परिवर्तनासाठी जबरदस्ती केली जाते. नकार दिल्यास त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जातो.” या प्रकरणामुळे जेल प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याआधीही पेट्रस गायकवाड (Petrus Gaikwad Controversy) हे विविध कारणांमुळे वादात सापडले आहेत. यामध्ये कैद्यांकडून स्वतःच्या गाडीची धुलाई करून घेणे, जेल परिसरातील अवैध वृक्षतोड, तसेच गांजाच्या साठ्याचे प्रकरण अशा अनेक आरोपांचा समावेश आहे. या सर्व घटनांमुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.
Petrus Gaikwad Controversy | गोपीचंद पडळकर आणि कैद्यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया :
या प्रकरणात आता राजकीय रंगही चढला आहे. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. पडळकर म्हणाले की, “पेट्रस गायकवाड यांनी धर्मांतराचं काम सुरू केलं आहे आणि हे अत्यंत गंभीर आहे.”
दरम्यान, एका कैद्याची पत्नीही पुढे आली आहे. तिच्या मते, तिच्या पतीवर मुस्लिम धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात आहे. या दाव्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून जेल प्रशासनावर नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दक्षता समितीचा तपास सुरू :
या सर्व प्रकरणाची दक्षता समितीने दखल घेतली असून तपासासाठी एक पथक बीडच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, पेट्रस गायकवाड (Petrus Gaikwad Controversy) यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
या नवीन आरोपांमुळे बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वाल्मिक कराडपासून सतीश भोसले आणि आता धर्मांतर वादापर्यंत, गायकवाड यांच्या नावाभोवती निर्माण झालेला वाद अजून संपलेला दिसत नाही.






