Baramati rahuri Election | निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाच राज्यांच्या निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची (By-poll) घोषणा केली आहे. यामध्ये बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक होणार असून या दोन्ही ठिकाणी 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. बारामतीचे माजी आमदार अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे काही काळापूर्वी निधन झाल्याने त्या मतदारसंघाची जागाही रिक्त झाली होती. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 9 एप्रिल रोजी आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी येथे मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडेल. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार असून 23 एप्रिल आणि 29 एप्रिल या दिवशी मतदान होईल. या सर्व राज्यांतील मतमोजणी 4 मे रोजी केली जाईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केले जातील.
दरम्यान, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या पोटनिवडणुका बिनविरोध होण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून उमेदवार दिला जाईल का याबाबत साशंकता आहे. राहुरीतही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.






