Pinky Mali | बारामती (Baramati) येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात तरुण मुलगी गमावल्यानंतर आता तिच्या आईची प्रकृती गंभीर बनली असून दादर (Dadar) येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे कुटुंब पूर्णपणे हादरून गेले असून उपचारांसाठी मदतीची गरज निर्माण झाली आहे.
विमान अपघातात मुलीचा मृत्यू, कुटुंबाला जबर धक्का :
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत सुरक्षा रक्षक विदीप जाधव (Vidip Jadhav), फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी (Pinky Mali), पायलट कॅप्टन सुमित कपूर (Captain Sumit Kapoor) आणि सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक (Captain Shambhavi Pathak) यांचा समावेश होता. या अपघाताने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
या अपघातात पिंकी माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मुंबईतील माळी कुटुंबावर मोठे संकट ओढवले. कुटुंबातील तरुण, कमावती मुलगी अचानक गेल्याने सर्वच नातेवाईक हादरून गेले. पिंकीच्या निधनानंतर तिच्या आईला हा धक्का सहन न झाल्याने त्या पूर्णपणे कोलमडून पडल्या. मुलीच्या आठवणीने आणि दुःखाने त्या सतत व्याकुळ असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
Pinky Mali | आईची प्रकृती खालावली, उपचारांसाठी मदतीची हाक :
मुलगी गमावल्यानंतर पिंकी माळी यांच्या आई माया माळी (Maya Mali) यांची मानसिक आणि शारीरिक अवस्था गंभीर झाली. गेल्या महिन्याभरापासून त्या सतत रडत असून तीव्र मानसिक धक्क्यामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दादर येथील शुश्रूषा सिटीझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल लिमिटेड (Shushrusha Citizens’ Co-operative Hospital Limited) येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
या कठीण प्रसंगी माळी कुटुंबासमोर आर्थिक संकटही उभे ठाकले आहे. पिंकी माळी यांचे वडील टॅक्सीचालक असून कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. रुग्णालयातील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जात असल्याने हे ओझे पेलणे त्यांना अशक्य होत आहे. मुलगी गमावल्यानंतर आता पत्नीला वाचवण्यासाठी वडील सर्वत्र मदतीसाठी धाव घेत आहेत. मित्रपरिवार, ओळखीचे लोक आणि समाजसंस्थांकडे त्यांनी मदतीची आर्त विनंती केली आहे.
“मुलगी गेली, आता किमान पत्नी तरी वाचवा,” अशी भावनिक हाक देत पिंकीच्या वडिलांनी समाजाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. एका पाठोपाठ येणाऱ्या दुःखद घटनांमुळे माळी कुटुंब पूर्णपणे खचून गेले असून, सध्या त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ असल्याचे बोलले जात आहे.






