ऑगस्टपासून महागाईचा झटका; ‘या’ वस्तू महागणार

On: July 28, 2026 1:13 PM
Inflation
---Advertisement---

Inflation | पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत असून कच्च्या मालाच्या दरांमध्ये चढ-उतार, वाढलेला वाहतूक खर्च आणि चलनातील घसरण यामुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर दबाव वाढला आहे. परिणामी ऑगस्टपासून ग्राहकांच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. चहा, हेअर ऑइल, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि प्रवासी वाहनांसह विविध वस्तूंच्या किमती 4 ते 8 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ऑगस्टपासून अनेक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता :

ग्राहकपयोगी वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांसमोर वाढत्या खर्चाचे आव्हान निर्माण झाले आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या मालाच्या किमती स्थिर नसून वाहतूक खर्चही वाढला आहे. त्यातच चलनाच्या विनिमय दरातील चढ-उतार सुरू असल्याने कंपन्यांच्या खर्चात आणखी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यापासून चहा, हेअर ऑइल, रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन, कपडे आणि पॅसेंजर वाहनांसारख्या उत्पादनांच्या किमतींमध्ये 6 ते 8 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. फेस्टिव्ह सीझन सुरू होण्याआधी दरवाढ करण्याची ही शेवटची योग्य संधी असल्याचे कंपन्यांना वाटत आहे. त्यामुळे मागणीवर मोठा नकारात्मक परिणाम होणार नाही, अशी त्यांची अपेक्षा आहे.

ऑगस्टमध्ये केरळमध्ये ओणम (Onam) सणापासून देशातील फेस्टिव्ह सीझनला सुरुवात होईल. त्यानंतर गणपती, नवरात्री आणि दिवाळीपर्यंत सणांचा काळ सुरू राहणार असून हा कालावधी नोव्हेंबरपर्यंत चालेल. हायर इंडियाचे (Haier India) चीफ एक्झिक्युटिव्ह सतीश एनएस यांनी पश्चिम आशियातील परिस्थिती स्थिर होईल अशी अपेक्षा होती, मात्र पुन्हा वाढलेल्या तणावामुळे दरवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असे सांगितले. एक्सचेंज रेटमधील अस्थिरता आणि कमोडिटी तसेच क्रूड डेरिव्हेटिव्ह्जच्या वाढलेल्या किमती यामागे कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले. आतापर्यंत उद्योगाने वाढलेल्या खर्चाचा भार ग्राहकांवर टाकलेला नसला तरी आता तो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Inflation | इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांवरही महागाईचा परिणाम :

कपड्यांच्या ब्रँड्सनी आतापर्यंत तुलनेने कमी दरात खरेदी केलेला जुना स्टॉक विकून दरवाढ टाळली होती. मात्र आता जास्त किमतीत खरेदी केलेला नवीन माल दुकानांमध्ये पोहोचत असल्याने किमती वाढवणे कंपन्यांसाठी जवळपास अपरिहार्य बनले आहे. पश्चिम आशियातील तणाव कायम राहिल्यास काही कंपन्या ऑगस्टमध्ये तब्बल 8 टक्क्यांपर्यंत दर वाढवू शकतात.

दुसरीकडे, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या विविध श्रेणीतील उत्पादनांच्या किमती 4 ते 6 टक्क्यांनी वाढवण्याचा विचार करत आहेत. रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्या किमती याच वर्षी आतापर्यंत सुमारे 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर टेलिव्हिजनच्या किमती 15 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. मेमरी चिपच्या किमतीत मोठी वाढ आणि त्याच्या पुरवठ्यात घट झाल्याने स्मार्टफोनच्या किमतींवरही परिणाम होत आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांत मेमरी चिपचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे स्मार्टफोनही महागण्याची शक्यता आहे.

News title : August Inflation May Hit Consumers

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now