ATM Charges Hike | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम 1 मे 2025 पासून लागू होणार असून, मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. (ATM Charges Hike)
1 मेपासून एटीएम व्यवहारांचे नवे नियम
आरबीआयने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, जर ग्राहकांनी स्वतःच्या बँकेच्या किंवा दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून विनामूल्य व्यवहार मर्यादा ओलांडली, तर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी ही रक्कम 21 रुपये होती.
ग्राहकांना दरमहा त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएमवर 5 मोफत व्यवहार आणि महानगरांमध्ये दुसऱ्या बँकेच्या एटीएमवर 3 मोफत व्यवहार करण्याची मुभा आहे. नॉन-मेट्रो भागांमध्ये दुसऱ्या बँकेच्या एटीएमवर दरमहा 5 मोफत व्यवहार करता येतात. मात्र, ही मर्यादा ओलांडल्यावर आता प्रत्येक व्यवहारासाठी अधिक शुल्क आकारले जाईल.
एटीएम शुल्क वाढीमागचं कारण
आरबीआयच्या (RBI) निवेदनानुसार, एटीएम देखभाल, रोख व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या वाढत्या खर्चामुळे बँकांनी व्यवहार शुल्क वाढवण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 2021 मध्येही व्यवहार शुल्क 20 रुपयांवरून 21 रुपयांवर करण्यात आले होते.
नवीन वाढीमुळे एटीएम ऑपरेटर आणि बँकांना मोठा दिलासा मिळणार आहे, मात्र सर्वसामान्य ग्राहकांना आता एटीएमचा अतिरिक्त वापर करताना जास्त शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन करताना नागरिकांनी एटीएम व्यवहार मर्यादेच्या आत राहण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला जात आहे.
Title : ATM Charges Hike from 1st May






