Ashok Kharat Property | नाशिकमध्ये स्वतःला ज्योतिष व आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधातील कारवाईला आता गती मिळाली आहे. एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्याला अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्या मालमत्तांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या तपासात त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याची माहिती समोर येत आहे.
कोट्यवधींच्या मालमत्तेचा तपास सुरू :
स्वतःला कॅप्टन म्हणून ओळख देणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अटकेनंतर त्याच्या नावावर आणि संबंधित व्यक्तींच्या नावावर असलेल्या मालमत्तांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही वर्षांत त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याची चर्चा आहे.
तपासात असेही समोर आले आहे की नाशिक (Nashik) शहरात त्याचा एक आलिशान बंगला तसेच कार्यालय आहे. याशिवाय पाथर्डी परिसरात सुमारे 30 एकर जमीन त्याच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे तर सिन्नर, ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डी येथेही त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एकूण मालमत्ता जवळपास 200 कोटी रुपयांच्या आसपास असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात असून त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
Ashok Kharat Property | फार्महाऊसवर छापा, वादाची ठिणगी :
या प्रकरणातील तपास अधिक सखोल करण्यासाठी पोलिसांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या खरातच्या फार्महाऊसवर रात्री उशिरा धाड टाकली. या कारवाईदरम्यान त्या ठिकाणाची सविस्तर तपासणी करण्यात आली. तसेच याच परिसरातील इशान्येश्वर मंदिर आणि कुटी या ठिकाणीही पोलिसांनी पाहणी केली. स्थानिक पातळीवर या फार्महाऊसवर अनेक राजकीय नेते आणि कलावंत येत असल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान या प्रकरणाशी संबंधित आणखी एक बाब सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा अशोक खरातसोबतचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्या खरातच्या डोक्यावर छत्री धरून उभ्या असल्याचे दिसते. यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये त्या खरातचे पाद्यपूजन करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.






