Ladki Bahin Yojana | महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याचा एप्रिलमधील हप्ता थोडा विलंबाने मिळणार आहे. आता या हप्त्याची तारीख अधिकृतपणे निश्चित करण्यात आली आहे. एप्रिलचा हप्ता बँकेच्या खात्यात नेमका कधी जमा होणार? याकडे महिलांचे लक्ष लागले होते. आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana)
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर येणार एप्रिलचा हप्ता
या योजनेतील लाभार्थी महिलांना मार्च महिन्यात 8 तारखेला दोन हप्ते मिळाले होते. मात्र एप्रिलचा हप्ता यावेळी थोडा उशीराने मिळणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी महिलांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही रक्कम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजेच शुभ मुहूर्तावर जमा होणार आहे.
ज्या लाभार्थींना 8 मार्च रोजीचा हप्ता मिळालेला नव्हता, अशा महिलांना एप्रिलमध्ये दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम यादी आणि पात्रतेनुसारच हे पैसे दिले जातील. मार्च महिन्यात लाभार्थींची संख्या वाढलेली असतानाही, फेरतपासणी प्रक्रियेनंतर एप्रिलमध्ये काही जणींना वगळले जाण्याची शक्यता आहे.
2100 रुपयांबाबत अद्याप निर्णय नाही
या योजनेतील महिलांना सध्या दरमहिना 1500 रुपये दिले जात आहेत. काही वेळा 2100 रुपयांचे हप्ते मिळतील अशी चर्चा झाली होती, मात्र सध्या सरकारकडून यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आयकर खात्याकडून लाभार्थ्यांची तपशीलवार माहिती मागवण्यात आली आहे, पण ती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
त्यामुळे मार्च आणि एप्रिलमधील लाभार्थ्यांची संख्या जवळपास सारखीच राहण्याची शक्यता आहे. हप्त्याच्या वितरणात बदल होतो की नाही, हे 30 एप्रिल रोजी स्पष्ट होईल. मात्र, महिलांना अक्षय्य तृतीयेला खात्यात थेट आर्थिक मदत मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
Title : April Installment of Ladki Bahin Yojana on April 30






