Anjali Damania | राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडवणाऱ्या घटनांनी वातावरण तापलं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांचा अधिवेशनादरम्यान ऑनलाईन रम्मी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे “गुंडगिरी थांबवा” अशी ठाम मागणी केली आहे.
सुरुवातीला आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांचा व्हिडीओही रोहित पवार यांनी पोस्ट करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली. “रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी” अशा शब्दांत त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला.
अंजली दमानियांची आक्रमक भूमिका :
अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विटरवरून जाहीरपणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आक्रमक मागण्या मांडल्या आहेत. “आता ही गुंडगिरी बास. सूरज चव्हाणांना ताबडतोब अटक करा. कृषीमंत्री अधिवेशनात रम्मी खेळतात आणि निषेध करणाऱ्यांना मारहाण होते? हे कुठल्या लोकशाहीत चालतं?”, असा सवाल करत त्यांनी सूरज चव्हाण, संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम यांना मंत्रिपदावरून तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.
त्यांनी स्पष्ट केलं की, मंगळवारी (२२ जुलै) दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्या या प्रकरणाविरोधात अधिकृत लढ्याची घोषणा करतील.
Anjali Damania | सूरज चव्हाण यांचा पलटवार :
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (suraj chavan) यांनीही अंजली दमानिया यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यात २५ खोक्यांचा बॅलन्स टाकला गेला”, असा गंभीर आरोप करत त्यांनी “स्वयंघोषित समाजसेविका” म्हणून टोला लगावला. यामुळे चर्चांना आणि आरोप-प्रत्यारोपांना अधिकच उधाण आले आहे.
या सर्व घडामोडींनी सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली आहे. एकीकडे मंत्र्यांचे वादग्रस्त वर्तन, दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्यांची थेट मुख्यमंत्र्यांवर दबावाची रणनीती – यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.






