“त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना?, अमोल मिटकरींची खोचक पोस्ट व्हायरल

On: April 16, 2025 5:24 PM
Amol Mitkari
---Advertisement---

Amol Mitkari  | सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. माळी गल्लीतून जात असताना एका कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला. जखमी झाल्यानंतर भिडे यांनी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतले.

सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या घटनेमुळे सांगली महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष देत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मिटकरींची ती पोस्ट काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी समाजमाध्यम ट्विटरवर एक उपरोधिक आणि टीकेचा सूर असलेली पोस्ट टाकत पुन्हा चर्चेला तोंड फोडले आहे. त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? असा सवाल करत त्यांनी कुत्र्यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि त्याला फाशी द्यावी, अशी खोचक टीका केली. तसेच, “चावतो म्हणजे काय? मुगलाई लागलीय का?” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

या पोस्टमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून समर्थक व विरोधकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. भिडे यांच्या समर्थकांनी या प्रकाराचा निषेध करत मिटकरी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

संभाजी भिडे यांची प्रकृती उत्तम

दरम्यान, भिडे यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय हणमंत पवार यांनी सांगितले. सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली आहे.

या घटनेनंतर सांगली महापालिकेने डॉग व्हॅनच्या मदतीने शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम तीव्र केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा उपाय महत्त्वाचा ठरत आहे. राजकीय टीका आणि प्रतिटिकांच्या या मालिकेत एक साधी कुत्र्याच्या चावण्याची घटना नव्या वादविवादांचे कारण ठरली आहे, हे मात्र निश्चित.

Title : Amol Mitkari Post On Sambhaji Bhide Guruji Sangli Dog Attack

Join WhatsApp Group

Join Now