Ajit Pawar Plane Crash | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या या दुर्घटनेनंतर अनेक व्हिडीओ समोर आले असून, अपघातामागील कारणांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.
धावपट्टीजवळ घडलेली भीषण दुर्घटना :
28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून (Mumbai) बारामती (Baramati) येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले होते. मात्र बारामती विमानतळाच्या (Baramati Airport) धावपट्टीच्या अगदी जवळ त्यांचे विमान कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून काही व्हिडीओ क्लिप्सही समोर आल्या आहेत, ज्यात विमान जमिनीवर आदळल्यानंतर चार ते पाच मोठे स्फोट झाल्याचे दिसून येते. (Ajit Pawar Plane Crash)
या दुर्घटनेनंतर काही लोकांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला. अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी या शपथविधीची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे सांगितले. त्यामुळे या घटनेभोवती राजकीय चर्चाही रंगल्या आहेत.
Ajit Pawar Plane Crash | डीजीसीएचा अहवाल समोर :
या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून, या प्रकरणासाठी सीआयडी (CID) पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अपघातानंतर केंद्र सरकारचे (Central Government) पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्राथमिक तपास केला. विमानाचे अवशेष पुढील तपासासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहेत. व्हिडीओ फुटेजमध्ये विमान हवेत असतानाच एका बाजूला झुकत असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्यामुळे नेमकी चूक कुठे झाली, याचा शोध घेण्यात येत आहे.
अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशीचे आदेश दिले. आता या चौकशीचा प्राथमिक अहवाल पुढे आला आहे. या अहवालानुसार, वैमानिकाचा अंदाज चुकणे किंवा विमानात तांत्रिक बिघाड होणे ही दोन प्रमुख शक्यता मानल्या जात आहेत. कारण विमान धावपट्टीच्या अगदी जवळ कोसळले होते. अपघाताच्या दिवशी दृश्यमानता (Visibility) कमी असल्याची माहिती सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे वैमानिकाच्या निर्णयक्षमतेवर परिणाम झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, या दोन्ही मुद्द्यांवर सध्या सखोल तपास सुरू आहे.






