Ajit Pawar Plane Crash | अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्यातील राजकारण तापलं असून या दुर्घटनेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघाताचा नेमका घटनाक्रम, सुरुवातीला दिलेली माहिती आणि त्यानंतर समोर आलेल्या विसंगतींमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी केली आहे. या दुर्घटनेभोवती वाढत चाललेले संशय दूर करण्यासाठी स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
२८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत त्यांच्यासह इतर काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरुवातीला प्रसारमाध्यमांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, नंतर उपलब्ध झालेल्या तपशीलांमध्ये काही बदल दिसून आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करत, अपघातात उल्लेख केलेली सहावी व्यक्ती नेमकी कुठे गेली? असा थेट सवाल उपस्थित केला होता. याच प्रश्नांना आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दुजोरा दिला असून त्यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी पुढे आली आहे.
अपघाताबाबत संशय वाढतोय :
या दुर्घटनेबाबत सुरुवातीला DGCA कडून धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर काही नेत्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये धुके स्पष्टपणे दिसत नसल्याचा दावा केला. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित करत अधिक चौकशीची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. (Ajit Pawar Plane Crash)
अमोल मिटकरी यांनी देखील सुरुवातीला सरकारकडून सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आल्याचं सांगत त्यावर आक्षेप घेतला. विमान पूर्णपणे जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत असताना सहावी व्यक्ती नेमकी कुठे आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचं त्यांनी म्हटलं. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, या प्रकरणात केवळ प्रशासकीय चौकशी पुरेशी नाही, तर न्यायालयीन चौकशीच झाली पाहिजे. त्यामुळेच जनतेतील संभ्रम दूर होईल आणि सत्य सर्वांसमोर येईल, असं त्यांनी नमूद केलं आहे.
Ajit Pawar Plane Crash | अर्थसंकल्पावरही खडसे यांची टीका :
दरम्यान, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरही जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब दिसून येत नसून केवळ मोठ्या घोषणा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “घोषणा करणे महत्त्वाचे नाही, तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. अर्थसंकल्पात दाखवण्यात आलेली तूट कशातून भरून काढणार, याचा स्पष्ट उल्लेख नाही,” असं ते म्हणाले.
शेतकऱ्यांसाठीही या अर्थसंकल्पात दिलासा देणाऱ्या ठोस उपाययोजना नसल्याची टीकाही त्यांनी केली. त्यामुळे एकीकडे अजित पवार यांच्या विमान अपघातावर न्यायालयीन चौकशीची मागणी होत असतानाच, दुसरीकडे केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरही विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली असून, अजित पवार यांच्या अपघाताबाबत सरकार पुढे कोणती पावले उचलते, न्यायालयीन चौकशीची मागणी मान्य होते का आणि त्यातून कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








