Ajit Pawar Plane Crash | अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्याला जबर धक्का बसला आहे. मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी जात असताना 28 जानेवारी 2026 रोजी त्यांचे विमान कोसळले आणि या दुर्घटनेत विमानातील एकही व्यक्ती वाचू शकली नाही. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून अपघातामागचे नेमके कारण काय, याबाबत तपास यंत्रणा गंभीरपणे चौकशी करत आहेत. (Ajit Pawar Plane Crash)
अपघातानंतर सोशल मीडियावर विविध व्हिडीओ व्हायरल झाले असून, विमान अचानक एका बाजूला झुकत कोसळल्याचे दृश्य दिसत आहे. यामुळे हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकांमुळे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले होते. आता तपासातून काही महत्त्वाची माहिती पुढे येत असून, या दुर्घटनेमागील कारणांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
धुके आणि लँडिंग अँगल ठरला अपघाताचा मुख्य कारण? :
मिळालेल्या माहितीनुसार, विमान धावपट्टीजवळ पोहोचले असताना परिसरात दाट धुके होते. यामुळे दृश्यता कमी झाली होती. याच वेळी विमान उतरवताना पायलटचा लँडिंग अँगल चुकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी धावपट्टीच्या अगदी शेजारी असलेल्या शेतात विमान कोसळले आणि भीषण दुर्घटना घडली.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, हवामानातील बदल, दृश्यतेचा अभाव आणि तांत्रिक बाबींची सांगड बसल्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निष्कर्ष तपास अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
Ajit Pawar Plane Crash | ब्लॅक बॉक्स तपासातून होणार अंतिम सत्य उघड :
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला असून, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरचे विश्लेषण सुरू आहे. या डेटामधून शेवटच्या क्षणी पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यात काय संवाद झाला, तसेच विमानाच्या हालचालींमध्ये नेमके काय बदल झाले, याचा तपशील समोर येणार आहे.
विशेष म्हणजे, अपघाताच्या काही मिनिटे आधी अजित पवार यांनी आपल्या एका कार्यकर्त्याशी फोनवर संवाद साधला होता, असेही समोर आले आहे. या कॉलनंतर काही क्षणांतच हा भीषण अपघात झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान अचानक झुकत खाली येताना दिसले आणि काही क्षणांतच जमिनीवर आदळले.






