Ajit Pawar | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र हालचाली सुरू झाल्या आहेत. विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) मधील आमदारांनी या घटनेभोवती संशय व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
अपघातानंतर राजकीय वर्तुळात अस्वस्थता :
बारामती (Baramati) येथे सभेसाठी जात असताना अजित पवार यांच्या विमानाचं लँडिंग होण्यापूर्वीच स्फोट झाल्याची माहिती देण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं असून, राजकीय वातावरणात प्रश्नोत्तरांसोबतच आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेनंतर अनेक तपशीलांवर चर्चा सुरू झाली असून, अपघाताच्या स्वरूपावर वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), जे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात, यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी प्रथम या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त करत केंद्रिय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली. मिटकरी म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर प्रचारासाठी अजित पवार बारामतीकडे येत होते, मात्र या प्रवासाचा शेवट इतक्या दुर्दैवी पद्धतीने होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती.
Ajit Pawar | कागदपत्रांबाबत संशय, सीबीआय चौकशीची मागणी :
अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी या अपघाताशी संबंधित काही बाबींवर स्पष्ट प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांच्या शेवटच्या प्रवासात अचानक मार्ग बदलण्यात आला आणि पायलटही तातडीने बदलण्यात आला होता. इतकंच नाही तर, दुर्घटनेनंतर मृतदेह जळाले असल्याचं सांगण्यात आलं असताना, विमानातील कागदपत्रांचा एकही तुकडा न जळणं ही बाब संशयास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. या विरोधाभासी परिस्थितीमुळे अनेक शंका निर्माण होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सीबीआय (CBI) चौकशीची औपचारिक मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिल्याचं मिटकरी यांनी सांगितलं. त्याचबरोबर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुनिश्चित केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.






