Air Taxi: रिक्षा आणि ओला-उबर विसरा! आता आकाशात उडणार ‘एअर टॅक्सी’; ट्रॅफिक जॅमचं टेन्शन संपणार

On: March 12, 2026 3:15 PM
Air Taxi
---Advertisement---

Air Taxi : शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी आता रस्त्याऐवजी आकाशाचा मार्ग उपलब्ध होणार आहे. ट्रॅफिकमधून सुटकेसाठी आता नवीन एअर टॅक्सी मार्केटमध्ये येणार आहे. नुकत्याच या एअर टॅक्सीची चाचणी झाली असून याचा व्हिडीओही समोर आलाय. त्यामुळे नागरिकांना ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असणार आहे.

अमेरिकेतील आघाडीची कंपनी जॉबी एव्हिएशन (Joby Aviation) हिने आपल्या पहिल्या उत्पादन मॉडेलच्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीचे चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या पार पाडले आहे. तंत्रज्ञानाच्या या क्रांतीमुळे भविष्यात प्रवाशांना अवघ्या काही मिनिटांत विमानतळ किंवा ऑफिस गाठणे शक्य होणार असून, हा कल्पना केलेला विचार आता वास्तवात उतरताना दिसत आहे.

कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, कॅलिफोर्निया (California) राज्यातील मरीना (Marina) येथील प्लांटमध्ये ही सुरुवातीची चाचणी उड्डाणे पार पडली. जॉबीचे अनुभवी वैमानिक विविध हवामानांत आणि तांत्रिक परिस्थितींत या विमानाची कार्यक्षमता तपासत आहेत. या सर्व चाचण्यांनंतर हे मॉडेल अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FAA) या नियामक संस्थेकडे प्रमाणपत्रासाठी सादर केले जाईल. गेल्या अनेक वर्षांच्या संशोधनानंतर आणि 50,000 मैलांहून अधिक उड्डाणाच्या अनुभवानंतर कंपनीने हे यश संपादन केले आहे.

जॉबीची ही एअर टॅक्सी ‘इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग’ (eVTOL) या तंत्रज्ञानावर आधारित आहे. या विमानाला एकूण सहा रोटर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ते हेलिकॉप्टरप्रमाणे एकाच जागेवरून उभ्या दिशेने उड्डाण करू शकते आणि हवेत विमानाप्रमाणे वेगाने धावू शकते. यात एका पायलटसह चार प्रवाशांच्या बसण्याची सोय असून, पारंपारिक हेलिकॉप्टरच्या तुलनेत हे विमान अत्यंत शांत आहे, ज्यामुळे शहरात ध्वनी प्रदूषण होणार नाही.

वेग, क्षमता आणि दुबईतील पदार्पण

या एअर टॅक्सीचा कमाल वेग ताशी 200 मैल (सुमारे 321 किलोमीटर) असून एकदा चार्ज केल्यावर ती 100 मैल (सुमारे 160 किलोमीटर) अंतर कापू शकते. सुरक्षित प्रवासासाठी यामध्ये प्रगत सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. कंपनीने 2026 च्या अखेरीस दुबईमध्ये (Dubai) जगातील पहिली व्यावसायिक हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी दुबईमध्ये चार विशेष लँडिंग साइट्स विकसित केल्या जात असून त्यापैकी दोनचे बांधकाम वेगाने सुरू आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी जॉबी एव्हिएशनने उबर (Uber) या राईड-हेलिंग कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या करारानुसार, प्रवासी आपल्या मोबाईलमधील उबर अ‍ॅपद्वारेच एअर टॅक्सी बुक करू शकतील. विशेष म्हणजे, ही सेवा केवळ विमान प्रवासापुरती मर्यादित नसून, प्रवाशांना त्यांच्या घरापासून टेक-ऑफ पॉइंटपर्यंत आणि लँडिंगनंतर अंतिम गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी कॅबची सुविधाही एकाच बुकिंगमध्ये दिली जाणार आहे.

Join WhatsApp Group

Join Now