Ahilyanagar Acid Attack | अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरुणाने ॲसिड हल्ला केला आहे. वडगाव पान येथील शाळेत शिकणारी ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना हा प्रकार घडला. रस्त्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला अडवले आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून पळ काढला.
या हल्ल्यात मुलीच्या उजव्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्याच्या भागावर गंभीर भाजल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी मुलीला प्रथम वडगाव पान येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
राज्यात संतापाची लाट
घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून मुलीचा जबाब आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हल्ल्याचा धक्का बसलेल्या या बालिकेने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीत आपल्यावर हल्ला करणारा व्यक्ती पूर्णपणे अनोळखी असल्याचे स्पष्ट केले आहे. या संतापजनक प्रकाराची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेने वेगाने सूत्रे हलवली आहेत. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती आणि पीडितेचा अधिकृत जबाब नोंदवून घेत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या नराधमाला जेरबंद करण्यासाठी पोलिसांची विविध विशेष पथके स्थापन करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यासोबतच ती शिकत असलेल्या शाळेच्या ठिकाणीही कसून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ वडगाव पान आणि आसपासच्या गावांतील नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सर्वपक्षीय नेतेही या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. आरोपीला तातडीने अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या घटनेची दखल घेत पोलिसांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे राज्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






