Agniveer Recruitment | देशसेवेची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी पुन्हा चालून आली आहे. इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025 (Indian Army Agniveer Jobs 2025) साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे अनेक इच्छुक तरुणांना पुन्हा अर्ज करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख-
इंडियन आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची घोषणा आहे. अग्निवीर भरती 2025 (Indian Army Agniveer Jobs 2025) साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आता 25 एप्रिल 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. याआधी ही तारीख 10 एप्रिल 2025 होती. अनेक उमेदवार विविध कारणांमुळे वेळेत अर्ज करू शकले नव्हते. त्यांच्यासाठी ही मुदतवाढ म्हणजे सुवर्णसंधी ठरणार आहे.
अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट http://joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्ज सादर करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चुकीची माहिती भरल्यास फॉर्म रद्द होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण तपशील बारकाईने तपासणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षा वेळापत्रक
अग्निवीर पदासाठी पात्र ठरण्यासाठी काही शैक्षणिक निकष निर्धारित करण्यात आले आहेत. सामान्य कर्तव्याच्या अग्निवीरसाठी किमान 45 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण आवश्यक आहेत. याशिवाय, लाइट मोटर व्हेईकलसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्यांना अधिक संधी मिळेल.
टेक्निकल पदासाठी 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ट्रेड्समनसाठी किमान 33 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवाराचे वय 17.5 ते 21 वर्षांच्या दरम्यान असावे. या संदर्भात अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर तपासता येईल.
अग्निवीर भरतीसाठी लेखी परीक्षा जून 2025 मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील अचूक वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. ही भरती ‘अग्नीपथ’ योजनेअंतर्गत केली जात असून यात सैनिक, नाविक आणि वायु सैनिक अशा विविध पदांवर भरती होते. ही संपूर्ण प्रक्रिया शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या टप्प्यांमधून पार पडते.
English Title: Agniveer recruitment Deadline Extended






