RCB | आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावल्यानंतर RCB संघासाठी आनंदाचा क्षण ठरलेला होता. मात्र, त्या विजयानंतरच्या आनंद सोहळ्यात चक्क ११ चाहत्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणावर जमलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेने संपूर्ण देशात शोककळा पसरली.
RCB चा मदतीचा निर्णय :
या दुर्घटनेनंतर RCB फ्रँचायझीनं मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मृत ११ चाहत्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी ₹10 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासोबतच ‘RCB Cares’ नावाचा एक विशेष निधी तयार केला जाणार असून, भविष्यातील अशा अडचणीत RCB चाहत्यांच्या मदतीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.
RCB ने सोशल मीडियावरून अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की,
“आमच्या चाहत्यांच्या सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचं काहीही नाही. ही दुर्दैवी घटना अत्यंत वेदनादायक आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहोत आणि त्यांच्या दु:खात सहभागी आहोत.”
RCB च्या निर्णयाची सर्वत्र स्तुती :
RCB खेळाडूंचा सत्कार चालू असतानाच बाहेर ही दुर्घटना घडल्याने संघावर टीकाही झाली होती. मात्र, आरसीबीने तत्काळ प्रशासनासोबत समन्वय साधत कार्यक्रम थांबवला आणि परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य केलं.
या निर्णयामुळे RCB चं कौतुक केलं जात असून, क्रिकेट फक्त खेळ नाही तर सामाजिक जबाबदारीही आहे, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांसाठी ही मदत काही प्रमाणात दिलासा देणारी ठरेल.






