Shefali Jariwala | ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) यांचे शुक्रवारी रात्री वयाच्या ४२ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. राहत्या घरी कोसळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
तपासात काय म्हटलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफाली (Shefali Jariwala) शुक्रवारी रात्री तिच्या घरी अचानक कोसळली. तिचा पती, अभिनेता पराग त्यागी (Parag Tyagi), यांनी तिला तात्काळ अंधेरी येथील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (Bellevue Multispeciality Hospital) दाखल केले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, तिचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर तिचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जुहू येथील आर. एन. कूपर रुग्णालयात (R N Cooper Hospital) नेण्यात आले.
कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी मात्र शेफालीच्या मृत्यूचे कारण रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे (sudden dip in blood pressure) असू शकते, असा संशय व्यक्त केला आहे. पती पराग त्यागीने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, रविवारी घरी सत्यनारायण पूजेनिमित्त शेफालीचा उपवास होता आणि आदल्या दिवशी बनवलेले अन्न खाल्ल्यानंतर ती कोसळली.
व्हिटॅमिनच्या गोळ्या असलेले दोन बॉक्स-
पोलिसांनी या प्रकरणी पती पराग आणि इतर कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. तिच्या घरातून पंचनामा करताना पोलिसांना अँटी-एजिंग, स्किन ग्लो आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या असलेले दोन बॉक्स सापडले. शेफाली डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेत होती, पण त्यामुळे तिला पूर्वी कधीही त्रास झाला नव्हता, असे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.
या प्रकरणात अद्याप कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नाही आणि पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जरीवाला कुटुंबीयांनी तिच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले असून, पोलीस अपघाती मृत्यू (ADR) म्हणून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






