Huma Qureshi | दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा (Huma Qureshi) चुलत भाऊ आसिफ कुरेशी यांची स्कूटी पार्किंगच्या छोट्याशा वादातून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी (७ ऑगस्ट) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची हत्या झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि दोन आरोपींना अटक केली आहे.
पार्किंगवरून भांडण
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री आसिफ कुरेशी आणि काही लोकांमध्ये पार्किंगवरून भांडण झाले होते. आसिफने आरोपींना घराच्या गेटबाहेर स्कूटर पार्क करू नका असे सांगितले होते, परंतु त्यांनी ऐकले नाही. या वादातून एका आरोपीने आसिफवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात आसिफच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत आसिफ कुरेशीच्या पत्नीने सांगितले की, रात्री ९.३० ते १० च्या सुमारास शेजाऱ्याच्या मुलाने घराबाहेर स्कूटर उभी केल्याने दरवाजा बंद झाला होता. आसिफने त्याला गाडी थोडी पुढे घ्यायला सांगितल्यावर तो मुलगा शिवीगाळ करू लागला आणि “तुला तिथेच येऊन सांगतो” असे बोलून खाली आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या भावाने मिळून आसिफच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. त्याच्या पत्नीने तात्काळ तिच्या मेहुण्याला घरी बोलावले, पण तोपर्यंत आसिफचा मृत्यू झाला होता.
भावाचा मृत्यू
आसिफ कुरेशी यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, यापूर्वीही त्यांच्यात आणि त्या दोन भावांमध्ये पार्किंगवरून वाद झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांना आज (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले जाईल. गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले असून, पोलीस कुटुंबीय आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत. पुढील तपास सुरू आहे.
News Title- Actress Huma Qureshi’s Cousin Brother Murdered in Delhi Over Scooty Parking Dispute






