CBSE शाळांकडून पालकांची लूट? ‘या’ गंभीर तक्रारीची सरकारने घेतली दखल; विधानसभेत झाली मोठी घोषणा!

On: July 2, 2026 5:20 PM
School Education
---Advertisement---

School Education | राज्यातील खासगी आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) संलग्न काही शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातून पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारींवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा विधानसभेत करण्यात आली.

पालकांच्या तक्रारींवर सरकारची भूमिका स्पष्ट :

15 जूनपासून राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर अनेक पालकांना शाळेकडून ठरावीक ठिकाणाहूनच पुस्तके, वह्या आणि इतर साहित्य खरेदी करण्यास सांगितल्याच्या तक्रारी समोर आल्या. खासगी तसेच सीबीएसई (CBSE) संलग्न शाळांमध्ये शालेय साहित्य वाढीव दराने विकले जात असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी कोणत्याही शाळेला पालकांवर विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.

मंत्र्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास शालेय शिक्षण विभाग (School Education Department) संबंधित शाळांवर कारवाई करेल. यापूर्वीही काही शाळांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरातून दिली. विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी शासन या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

School Education | देखरेखीसाठी समिती, कॉपीप्रकरणीही मोठी कारवाई :

विधानसभेत या विषयावर सविस्तर चर्चा आणि गोंधळ झाल्यानंतर शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी अशा शाळांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या समितीच्या माध्यमातून नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवले जाणार असून, गैरप्रकार आढळल्यास संबंधित शाळांविरोधात आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे. समितीची स्थापना आणि तिच्या कार्यपद्धतीबाबतची पुढील माहिती लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याच लेखी उत्तरात दादा भुसे यांनी राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांमधील गैरप्रकारांबाबतही माहिती दिली. 2026 मधील परीक्षांदरम्यान सामूहिक कॉपी आणि इतर गैरप्रकारांमुळे 100 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सामूहिक कॉपीची सर्वाधिक 650 प्रकरणे अमरावती (Amravati) विभागात, तर 501 प्रकरणे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) विभागात नोंदवली गेली.

तसेच बारावी परीक्षेदरम्यान गैरप्रकारांप्रकरणी एकूण 15 गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये अमरावती विभागात 8, नागपूर (Nagpur) विभागात 3, छत्रपती संभाजीनगर विभागात 3 आणि लातूर (Latur) विभागात 1 गुन्ह्याची नोंद झाली आहे. तसेच 2026 च्या बारावी परीक्षेत सामूहिक कॉपीची एकूण 1,469 प्रकरणे समोर आल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.

News Title: Action Against Schools Forcing Book Purchases

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now