Raghav Chadha | अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने राज्यसभेत मोठा संघटनात्मक बदल केला आहे. पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील डेप्युटी लीडर पदावरून हटवण्यात आले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राघव चड्ढा हे राज्यसभेतील पक्षाचे प्रमुख युवा नेते मानले जात होते. ते अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचे पती आहेत. आता पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
राघव चड्ढांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती :
आम आदमी पार्टीने राज्यसभा सचिवालयाला पत्र पाठवून डेप्युटी लीडर पदासाठी नवीन नाव कळवले आहे. राघव चड्ढा यांच्या जागी अशोक कुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे चान्सलरही आहेत.
अशोक मित्तल यांना 2022 मध्ये पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. संसदेत त्यांनी कृषी आणि शिक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर सक्रियपणे भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले आहे. शांत आणि तार्किक कार्यशैलीमुळे ते राज्यसभेत पक्षाचा अजेंडा प्रभावीपणे मांडू शकतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
Raghav Chadha | मौनामुळे वाढले होते तर्क-वितर्क :
गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा (Raghav Chadha) पक्षाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शांत असल्याची चर्चा होती. विशेषतः पक्षातील काही महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे ते पक्षापासून दूर जात असल्याचे संकेत असल्याचेही काही राजकीय विश्लेषकांचे मत होते.
अलीकडेच आबकारी धोरण प्रकरणात पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना दिलासा मिळाल्यानंतरही राघव चड्ढा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच त्यांची केजरीवाल यांच्यासोबत भेट झाल्याचीही माहिती समोर आली नव्हती. या पार्श्वभूमीवर पक्षाने घेतलेला हा निर्णय मोठा राजकीय बदल म्हणून पाहिला जात आहे.






