Aadhaar Card Updates | सध्याच्या काळात आधार कार्ड हे केवळ एक ओळखपत्र नसून सर्व सरकारी योजना, बँकिंग आणि प्रशासकीय कामांसाठीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आधारवरील वैयक्तिक माहिती अचूक असणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. हीच गरज ओळखून केंद्र सरकारने देशवासीयांचे पैसे वाचवणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना आपल्या आधार कार्डशी जोडलेला ईमेल आयडी (Email ID) कोणत्याही शुल्काशिवाय बदलण्याची किंवा दुरुस्त करण्याची मुभा देण्यात आली आहे.
सेवा शुल्कातून पूर्ण मुक्ती; घरबसल्या मोबाईलवर होणार काम
पूर्वी आधार कार्डमधील ईमेल आयडी बदलण्यासाठी किंवा नवीन नोंदणी करण्यासाठी नागरिकांना ७५ रुपये फी आणि त्यावर लागणारा जीएसटी (GST) भरावा लागत असे. तसेच आधार सेवा केंद्रांवर (Aadhaar Seva Kendra) जाऊन ताटकळत उभे राहावे लागत होते. मात्र, नवीन नियमांनुसार आता ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. नागरिक ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत या सुविधेचा मोफत लाभ घेऊ शकतात. विशेष म्हणजे, यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नसून, लोक स्वतःच्या मोबाईल फोनच्या साहाय्याने घरबसल्या हा बदल करू शकणार आहेत.
ईमेल अपडेट असणे का आवश्यक आहे?
अनेक शासकीय आणि निमशासकीय ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा आर्थिक व्यवहार करताना ईमेल पडताळणी (Email Verification) आवश्यक असते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आधार कार्डचे डिजिटल प्रमाणीकरण करण्यासाठीही अचूक ईमेल आयडी असणे फायदेशीर ठरते.
अशी आहे ईमेल अपडेट करण्याची सोपी पद्धत:
सर्वप्रथम नागरिकांकडे UIDAI चे अधिकृत ‘Aadhaar App’ असणे आवश्यक आहे.
या ॲपमध्ये यशस्वीरित्या लॉगिन केल्यानंतर मुख्य स्क्रीनवर जावे.
तिथे दिलेल्या ‘Update Email’ किंवा ‘Update Aadhaar Details’ या पर्यायावर क्लिक करावे.
त्यानंतर आपला नवीन आणि चालू असलेला ईमेल आयडी प्रविष्ट करून पुढील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी.
News Title: Aadhaar Card Updates Free Email Link Scheme UIDAI Mobile Application






