Aadhaar Card Alert | जर आपल्या लहान मुलाचे आधार कार्ड काढले असेल आणि त्याचे वय आता ५ वर्षांपेक्षा जास्त झाले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने स्पष्ट केलं आहे की, ५ ते ७ वयोगटातील सर्व मुलांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणे अनिवार्य आहे. हे अपडेट न केल्यास आधार कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे.
आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेट का गरजेचं? :
५ वर्षांपर्यंत मुलांचं आधार कार्ड तयार करताना केवळ फोटो, नाव, जन्मतारीख आणि पत्ता इतक्याच माहितीचा समावेश केला जातो. फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन (बायोमेट्रिक्स) वयाच्या लहानपणी स्थिर नसतात, त्यामुळे ते घेतले जात नाहीत. मात्र मुलं ५ वर्षांचे झाल्यावर त्यांच्या बायोमेट्रिक माहितीचा समावेश आवश्यक होतो. (Aadhaar Card Alert)
UIDAI ने अशा लाखो पालकांना SMS द्वारे अलर्ट मेसेज पाठवले आहेत, ज्यांच्या मुलांचे बायोमेट्रिक्स अद्याप अपडेट झालेले नाहीत. पालकांनी आधार सेवा केंद्रात जाऊन, मोफत बायोमेट्रिक अपडेट करावं, असं आवाहन UIDAI ने केलं आहे.
Aadhaar Card Alert | काय आहे MBU (Mandatory Biometric Update)? :
– ५ ते ७ वयोगटातील मुलांसाठी MBU मोफत आहे.
– ७ वर्षांनंतर MBU केल्यास ₹100 शुल्क आकारले जाते.
– MBU अंतर्गत फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन आणि फोटो अपडेट करणे बंधनकारक आहे.
जर ७ वर्षांपर्यंत बायोमेट्रिक अपडेट केला नाही, तर UIDAI नियमांनुसार संबंधित मुलाचं आधार क्रमांक निष्क्रिय (Deactivated) होऊ शकतो. यामुळे पुढील सेवा जसे की, शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती योजनांमध्ये सहभाग, DBT (डायरेक्ट फायनान्शियल ट्रान्सफर) योजनांमध्ये लाभ घेणं यावर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, UIDAI च्या संकेतस्थळावरून https://uidai.gov.in किंवा [mAadhaar App] वरून नजीकचे आधार सेवा केंद्र शोधून लगेच वेळ ठरवा.








