New Bank Rules | 1 एप्रिल 2025 पासून देशात लागू होणाऱ्या नव्या बँकिंग नियमांमुळे ग्राहकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम होणार आहे. क्रेडिट कार्डचे फायदे, एटीएम व्यवहार, बचत खात्याचे नियम आणि व्याजदरांमध्ये बदल होत असल्याने नागरिकांनी हे बदल आधीच समजून घेतले तर आर्थिक दंड आणि गैरसोयीपासून बचाव होऊ शकतो. (New Bank Rules)
एटीएम व्यवहार, किमान बॅलेन्स आणि चेक व्यवहारात नवे बदल
देशातील विविध बँकांनी एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या नियमांत सुधारणा केली आहे. आता एका महिन्यात इतर बँकांच्या एटीएममधून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढण्याची मुभा असेल. यापेक्षा जास्त व्यवहार झाल्यास दरवेळी 20 ते 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपले व्यवहार नियोजितपणे करावेत.
तसेच, एसबीआय (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), कॅनरा बँक (Canara Bank) यांसारख्या बँकांनी त्यांच्या खात्यांवर किमान शिल्लक ठेवण्याचे नियम कठोर केले आहेत. शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागांनुसार ही किमान रक्कम ठरवली जाईल. ठराविक शिल्लक न राखल्यास दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
त्याचबरोबर, चेक व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System – PPS) लागू करण्यात येत आहे. याअंतर्गत 5000 रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी चेक सादर करताना तपशीलांची पूर्वपुष्टी आवश्यक असेल. यात चेक क्रमांक, तारीख, रक्कम आणि प्राप्तकर्त्याचे नाव यांचा समावेश असेल. यामुळे फसवणूक टळण्यास मदत होईल.
डिजिटल बँकिंग, व्याजदर आणि क्रेडिट कार्ड फायदे यांच्यात मोठे बदल
डिजिटल बँकिंग क्षेत्रातही बँका अधिक स्मार्ट होत असून, एआय-आधारित चॅटबॉट्स आणि प्रगत फिचर्स लाँच केले जात आहेत. व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक पडताळणीसारख्या सुरक्षा उपायांनाही अधिक मजबूत करण्यात येत आहे.
बचत खात्यांवरील आणि मुदत ठेवींवरील व्याजदरांत देखील सुधारणा होणार आहे. आता व्याजदर हे खात्यातील उपलब्ध शिल्लक रकमेवर आधारित असतील. जास्त शिल्लक रक्कम ठेवणाऱ्यांना अधिक व्याजदरांचा लाभ मिळू शकतो. या बदलामुळे बँकिंग प्रणाली अधिक स्पर्धात्मक आणि ग्राहकाभिमुख होईल. (New Bank Rules)
क्रेडिट कार्डच्या फायदेशी संबंधित महत्त्वाचा बदल म्हणजे विस्तारा सह-ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील तिकीट व्हाउचर, नूतनीकरण भत्ते आणि माइलस्टोन रिवॉर्ड्ससारखे फायदे काही बँका बंद करत आहेत. एसबीआय (SBI), आयडीएफसी फर्स्ट (IDFC First) आणि अॅक्सिस बँक (Axis Bank) यांनी हे बदल घोषित केले असून, अॅक्सिस बँकेचे नियम 18 एप्रिलपासून लागू होतील. त्यामुळे या कार्डधारकांनी नव्या अटी वाचून घेणे अत्यावश्यक आहे.
Title : 6 New Bank Rules from 1 April 2025






