ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार

On: June 10, 2026 6:53 PM
Thane water cut
---Advertisement---

Thane Water Supply | ठाणेकरांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) हद्दीतील काही भागांमध्ये 12 जून रोजी तब्बल 24 तास पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. जलवाहिनीच्या महत्त्वाच्या जोडकामासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए (MMRDA) मार्फत आनंदनगर ते साकेत या मार्गावरील एलिव्हेटेड रोडचे काम सुरू आहे. या प्रकल्पादरम्यान इंदिरानगर संपकडे जाणारी 813 मिमी व्यासाची विद्यमान वाहिनी बाधित होत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून 900 मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकूण 2200 मीटरपैकी सुमारे 800 मीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आता नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी विद्यमान पाइपलाइनचे जोडकाम केले जाणार आहे.

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार? :

या कामासाठी शुक्रवार, 12 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते शनिवार, 13 जून रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. जुन्या 813 मिमी जलवाहिनीऐवजी नव्याने अंथरण्यात आलेली 900 मिमी जलवाहिनी सुरू करण्यासाठी हा शटडाऊन आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या कालावधीत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर पाडा क्रमांक 2, 3 आणि 4, चैतीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवी पाडा, रामनगर, सी.पी. तलाव तसेच येऊर परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा मिळणार नाही. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी पूर्वतयारी करून आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा.

Thane Water Supply | पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरही खबरदारी :

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला जाईल. मात्र त्यानंतर पुढील एक ते दोन दिवस काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा वापर नियोजनबद्ध करावा.

दरम्यान, या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

News Title: 24-Hour Water Cut In Thane

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now