Mahad | महाड (Mahad) नगरपरिषदेच्या हद्दीत तब्बल ४५ लाख रुपये खर्चून एसटी आगारात उभारण्यात आलेलं स्वच्छतागृह सध्या दुर्लक्षित स्थितीत आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत उभारलेल्या या स्वच्छतागृहाकडे ना नगरपरिषद लक्ष देत आहे, ना एसटी प्रशासन. त्यामुळे हे बांधकाम पूर्ण होऊनही नागरिकांच्या वापरात येत नाही.
स्वच्छतागृहाचा उपयोग शून्य, पैसे वाया-
स्वच्छ भारत अभियानात महाड (Mahad) एसटी आगारात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आलं. या कामासाठी ४५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु आगार प्रशासनाने या इमारतीची देखभाल, साफसफाई आणि नियमित देखरेख करण्याबाबत कोणतीच जबाबदारी घेतली नाही. परिणामी, हे स्वच्छतागृह सुरुवातीपासूनच बंद अवस्थेत आहे.
या स्वच्छतागृहाच्या दारावर कायम कुलूप असून, प्रवाशांना कोणतीही सुविधा मिळत नाही. आगारात दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. महिलांसह अनेक नागरिकांना या सुविधेचा अभाव भासत आहे. नगरपरिषद आणि एसटी आगार प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे हा प्रकल्प केवळ शोभेची वस्तू बनून राहिला आहे.
आगार व्यवस्थापनाच्या उदासीनतेमुळे प्रश्न निर्माण-
स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी संघटनांनी अनेक वेळा या समस्येकडे लक्ष वेधलं. त्यांनी पालिका प्रशासन व आगार व्यवस्थापनाकडे पत्रव्यवहारही केला. मात्र कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारी निधीचा अपव्यय झाल्याची भावना नागरिकांत आहे.
महाड नगरपरिषद प्रशासनाने या कामासाठी टेंडर काढून योग्य ठिकाणी व स्वच्छतेच्या निकषांनुसार हे स्वच्छतागृह बांधले. परंतु प्रत्यक्ष वापराच्या टप्प्यावर प्रशासनातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. आजही हे स्वच्छतागृह बंद असून, ते सुरू होण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत.






