ZP Election 2026 | राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांदरम्यान मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचे आरोप सातत्याने समोर येत आहेत. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. विरोधकांकडूनही या मुद्द्यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या १५ वर्षांपासून एकाच प्रकारची शाई वापरली जात असून ती एकदा सुकल्यानंतर निघत नाही, असा दावा आयोगाने केला. मात्र, या वादानंतर आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत मार्कर पेनला फाटा :
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, सध्या वापरण्यात येणारी मार्करद्वारे लावली जाणारी शाई सुकल्यानंतर निघत नाही. मात्र काही ठिकाणी शाई पुसली जात असल्याचा गैरसमज आणि फेक नरेटिव पसरवला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी पत्रकारांनी जिल्हा परिषद निवडणुकीतही मार्करचाच वापर होणार का, असा थेट प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना वाघमारे यांनी स्पष्ट केलं की, मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत इंडिलेबल इंकचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मार्करऐवजी पारंपरिक पद्धतीने काडीने बोटाला शाई लावली जाणार आहे.
ZP Election 2026 | ५ फेब्रुवारीला मतदान; पारदर्शकतेवर भर :
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मतदान प्रक्रियेतील शंका दूर होण्याची शक्यता आहे. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. (ZP Election 2026)
निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षणाच्या चौकटीत या निवडणुका घेतल्या जात आहेत. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार असून, आयोग पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.






