BDO Bribe | मालेगाव पंचायत समिती कार्यालयात संतप्त युवकाने गटविकास अधिकारी (BDO) यांच्या अंगावर थेट नोटांची उधळण केली. कारण ब्राम्हणवाडा गावातील घरकुल लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. घरकुल मंजूर असूनही अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. (Washim BDO Bribe)
सदर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. ‘अधिक पैसे हवे का?’ असा संतप्त सवाल करत युवकाने नोटांचा ढीग बीडीओंच्या समोर फेकला. लाभार्थ्यांच्या हक्काच्या घरकुलाच्या रकमेवर अधिकाऱ्यांनी अडवणूक करत पैसे मागितल्याचे आरोप नागरिकांनी केले.
अधिकारी-पदाधिकाऱ्यांविरोधात संताप :
ब्राम्हणवाडा गावातील अनेक गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून, त्याच्या निधीत सातत्याने अडथळे निर्माण होत आहेत. काही महिने झाले तरी किस्त मिळत नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी होती. लाभार्थ्यांनी सांगितले की, वेळोवेळी पैशांची मागणी केली जात होती आणि न दिल्यास फायली पुढे सरकत नव्हत्या.
यामुळे संतप्त नागरिकांनी मालेगाव पंचायत समितीवर मोर्चा आणला. त्यात सहभागी एका युवकाने थेट नोटा उधळत भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. यामुळे समिती कार्यालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. बीडीओंच्या डोळ्यादेखत हे सगळं घडलं आणि अधिकारी अवाक झाले.
BDO Bribe | सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल :
घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामुळे प्रशासनाची दुटप्पी भूमिका आणि लाभार्थ्यांच्या अडचणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (BDO Bribe)
या घटनेमुळे शासकीय कामात प्रामाणिकपणाच्या अभावाची ओरड अधिक तीव्र झाली आहे. भ्रष्टाचाराविरोधात सामान्य माणूस थेट रस्त्यावर उतरतो आहे, हे यावरून स्पष्ट होतं.






