Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात जुलैच्या सुरुवातीला काही भागांत मुसळधार पाऊस झाला असला तरी आता मान्सूनची गती मंदावली आहे. बहुतांश जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली असून पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, काही निवडक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान :
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागांत उष्णता आणि उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जुलै महिन्यात सर्वसाधारणपणे दमदार पाऊस अपेक्षित असतो, मात्र सध्या महाराष्ट्रासह मध्य भारतातील अनेक भागांत मान्सूनची तीव्रता कमी झाली आहे.
मंगळवारी विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, जालना, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडू शकतात. राज्याच्या उर्वरित भागात मात्र पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Update | ‘या’ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट; पुढील तीन दिवसांचा अंदाज :
बुधवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, रायगड, ठाणे तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय नंदूरबार, धुळे, जळगाव, परभणी, नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहू शकते.
गुरुवारी सोलापूर, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सर्व जिल्हे, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली येथे हलक्या सरी पडू शकतात.






