Donald Trump Warning | जगभरात अनेक ठिकाणी तणाव वाढलेला असतानाच अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. इराणमधील अंतर्गत आंदोलनांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे भाष्य करत कठोर इशारे दिल्याने युद्धाची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे. त्यांच्या विधानांमुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
इराणमध्ये ( Iran protests) सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू असून नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इराणची जनता विजयाच्या अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं. अमेरिकेकडून मदतीचे संकेत देत त्यांनी इराणवर मोठ्या कारवाईची तयारी असल्याचंही सूचित केलं होतं. मात्र, इराण सरकारने त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
ट्रम्प यांची थेट धमकी, तणाव वाढला :
एका मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास अमेरिका संपूर्ण देश उद्ध्वस्त करू शकते. त्यांच्या या विधानामुळे अमेरिका-इराणमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. याआधीही ट्रम्प यांनी इराणला इशारा देत गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं म्हटलं होतं. (US Iran tension)
इराणकडूनही कठोर प्रतिक्रिया देण्यात आली असून देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप झाल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Donald Trump Warning | युद्धाचे संकेत, जागतिक परिणामांची भीती :
ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे हा तणाव फक्त दोन देशांपुरता मर्यादित न राहता जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. काही काळापासून अमेरिका इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकते, अशा चर्चा रंगत होत्या. आता दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्याने युद्धाची भीती अधिक गडद झाली आहे. (Donald Trump Warning)
सध्याच्या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या संघर्षाकडे लागले असून, परिस्थिती शांततेच्या मार्गावर जाईल की अधिक चिघळेल, याकडे जगाचं लक्ष केंद्रित झालं आहे.






