राज आणि उद्धव ठाकरेंच्या सभांचा सस्पेन्स संपला! संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

On: January 6, 2026 12:10 PM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut Statement | राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आक्रमक प्रचारात उतरले आहेत. ठिकठिकाणी जाहीर सभा, आरोप-प्रत्यारोप आणि विकासकामांच्या मुद्द्यांवरून वातावरण तापलेले असताना मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. मतदारांमध्येही यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. (BMC election campaign)

भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने प्रचारात आघाडी घेतली असताना राज आणि उद्धव ठाकरे का मैदानात उतरत नाहीत, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Statement) यांनी या चर्चांना थेट उत्तर दिले आहे. सभा न घेण्यामागे ठोस रणनिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सभा कधी आणि कुठे घ्यायच्या, हे आम्हाला माहीत आहे – संजय राऊत :

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सभा कधी घ्यायच्या, कुठे घ्यायच्या आणि कशा पद्धतीने घ्यायच्या याची संपूर्ण रणनीती आधीच ठरलेली आहे. “आमच्या सभा होत नाहीत म्हणून कुणी काय बोलतंय, याकडे लक्ष देऊ नका. ९ तारखेला पहिली सभा नाशिकमध्ये होणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत,” असे राऊत म्हणाले.

उगाचच मोठ्या सभा घेण्यापेक्षा थेट शाखांपर्यंत पोहोचण्याचे आणि अधिकाधिक लोकांशी थेट संपर्क साधण्याचे धोरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रचाराच्या वेळेची आणि स्वरूपाची योग्य मांडणी आम्ही केली असल्याचा दावा राऊत यांनी केला.

Sanjay Raut Statement | मुंबईत एकच अतिविराट सभा घेण्याचे नियोजन :

मुंबईतील सभांबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, मुंबईत एकच अतिविराट सभा घेण्यावर सर्वांचे एकमत आहे. “मुंबईत काही ठिकाणी मुद्दाम मैदान अडवून ठेवण्यात आले आहेत. मनसे आणि शिवसेनेला सभा घेता येऊ नये, यासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे उगाचच छोट्या सभा घेण्यापेक्षा एक भव्य आणि निर्णायक सभा घेण्याचे आमचे नियोजन आहे,” असे ते म्हणाले.

यासोबतच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखतही आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राऊत यांनी दिली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही मुलाखत होणार असून त्यासाठी भव्य सेटची उभारणी सुरू आहे.

संयुक्त मुलाखतीत विकासावरच चर्चा :

या मुलाखतीत राजकीय प्रश्नांपेक्षा मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासावरच चर्चा होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे मुंबईकर म्हणून ही मुलाखत घेणार असून, मुंबईकरांच्या अपेक्षा आणि प्रश्न ते दोन्ही नेत्यांना विचारणार आहेत. “राजकारणावर बोलायला वेळ मिळेल, पण आत्ताच्या मुलाखतीत सकारात्मक आणि विधायक मुद्द्यांवर भर असेल,” असे राऊत म्हणाले. (Uddhav Thackeray rally)

याचवेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले. “एकनाथ शिंदेंना कोरोना झालाच नव्हता. बनावट रिपोर्ट तयार करून नाटक करण्यात आलं होतं,” असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या काळातील कोरोना व्यवस्थापनाचे जागतिक पातळीवर कौतुक झाले होते, याची आठवण करून देत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

News Title: Why Raj and Uddhav Thackeray Are Not Holding Rallies? Sanjay Raut Gives Clear Answer

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now