Suresh Kalmadi Passes Away | पुण्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी (६ जानेवारी २०२६) पहाटे निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आजारपणामुळे उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात तसेच क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (Suresh Kalmadi Passes Away)
सुरेश कलमाडी हे काही काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र, त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत पुण्याच्या राजकारणावर खोलवर प्रभाव टाकला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. आज दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवाचे त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
भारतीय हवाई दलातील पायलट ते केंद्रीय मंत्री :
सुरेश कलमाडी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारतीय हवाई दलात पायलट म्हणून केली होती. पुण्यातील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन ते १९६० साली भारतीय वायुसेनेत दाखल झाले. १९६५ मध्ये पाकिस्तानविरोधातील युद्ध आणि १९७१ मध्ये बांगलादेश मुक्ती संग्रामादरम्यान त्यांनी देशसेवा बजावली. १९७४ साली निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
राजकारणात आल्यानंतर सुरेश कलमाडी यांनी काँग्रेस पक्षात विविध महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. १९८२ साली ते राज्यसभा खासदार झाले. त्यानंतर पुण्याचे लोकसभेचे खासदार म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. संजय गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. (Suresh Kalmadi death)
Suresh Kalmadi Passes Away | क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि वाद :
राजकारणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सुरेश कलमाडी यांचे मोठे योगदान राहिले आहे. ते भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. देशात आणि विशेषतः पुण्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुण्याचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर पोहोचवण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. (Suresh Kalmadi Passes Away)
मात्र, त्यांच्या कारकिर्दीत काही वादही उद्भवले. क्रीडा स्पर्धांच्या आयोजनादरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तरीही, त्यांच्या दीर्घ सार्वजनिक जीवनातील योगदान आणि प्रभाव नाकारता येत नाही. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.






