Manoj Jarange Patil | राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर आता छाननीची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी नाशिक दौऱ्यात महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. समाजासाठी काम करणारे लोक राजकारणात टिकले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. आपल्या हातात थेट मते नसली तरी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम आपण करतो, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत थेट कुणाला पाठिंबा यापेक्षा समाजातील कार्यकर्त्यांना बळ देण्यावर त्यांनी भर दिला आहे.
समाजासाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन :
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते राजकारणात पुढे आले पाहिजेत. असे लोक टिकले तरच समाजाचा आवाज मजबूत होईल. समाजाने देखील अशा कार्यकर्त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. “माझ्या हातात मते नाहीत, पण समाजाला मी आवाहन करू शकतो,” असे सांगत त्यांनी समाजाच्या एकजुटीवर भर दिला. आजचे व्यासपीठ राजकीय नसले तरी समाजहितासाठी आपली भूमिका मांडणे आवश्यक होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, निवडणुकीला उभे असलेल्या कार्यकर्त्यांची माहिती आधी मिळाली असती, तर आपण आधीच भेट दिली असती. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण नेहमी उभे राहतो, ही आपली भूमिका कायम असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले. समाजाची लढाई लढणाऱ्या तरुणांचा समाजाने सांभाळ केला पाहिजे, अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करून उपयोग नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
Manoj Jarange Patil | ट्रोलिंगवर संताप, दुष्परिणामांचा इशारा :
भाजप उमेदवार पूजा मोरे (Puja More) यांच्या ट्रोलिंग प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जुने व्हिडिओ काढून एखाद्याला लक्ष्य करणे चुकीचे आहे. जर एखाद्यावर अन्याय होत असेल तर तो स्वीकारार्ह नाही. मात्र, संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय ठोस वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक क्षेत्रात काम करताना कधी कधी कठोर बोलावे लागते, अन्यथा न्याय मिळत नाही, असे ते म्हणाले. (Local Body Elections)
ते पुढे म्हणाले की, राजकारणात जुने व्हिडिओ पसरवून एखाद्याला माघार घ्यायला लावण्याचे प्रकार सुरू असतील तर त्याचे दुष्परिणाम संबंधितांनाही भोगावे लागतील. आपण क्षत्रिय मराठा आहोत आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे हीच आपली भूमिका आहे. निवडणुकीत उभ्या असलेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहावे, असे पुन्हा एकदा आवाहन करत मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.






