नाशिक ते अक्कलकोट प्रवाशांसाठी गुड न्यूज! अशाप्रकारे 31 तासांचा प्रवास होणार 14 तासांत

On: January 1, 2026 11:45 AM
Nashik Solapur Akkalkot
---Advertisement---

Nashik Solapur Akkalkot | महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासाला नवे बळ देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या 374 किलोमीटर लांबीच्या सहापदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा तब्बल 31 तासांचा प्रवास थेट सुमारे 14 तासांपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अंतर्गत दळणवळणात मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे. (Nashik Solapur Akkalkot Corridor)

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 19,142 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात येणार असून, ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हा महामार्ग उभारण्यात येणार आहे. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्याअंतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूरसारख्या प्रमुख शहरांना थेट गतीमान जोड देणारा हा प्रकल्प राज्याच्या आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

देशातील प्रमुख महामार्गांशी थेट जोडणी :

हा प्रस्तावित ग्रीनफिल्ड कॉरिडॉर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराज्य महामार्गांशी जोडला जाणार आहे. नाशिकजवळील वाढवण बंदर इंटरचेंजच्या माध्यमातून हा मार्ग दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला जोडला जाणार आहे. तसेच नाशिकमधील राष्ट्रीय महामार्ग-60 च्या जंक्शनवरून आग्रा-मुंबई कॉरिडॉरशी आणि पांगरी परिसरात समृद्धी महामार्गाशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टीपासून थेट पूर्व किनारपट्टीपर्यंत जलद आणि सलग दळणवळण शक्य होणार आहे. (Nashik Solapur Akkalkot Corridor)

याच मार्गाचा पुढील विस्तार कुर्नूलमार्गे दक्षिण भारताशी जोडला जाणार असून, चेन्नई बंदराच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतुकीला मोठी गती मिळणार आहे. तिरुवल्लूर, रेणिगुंटा, कडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते महाराष्ट्र सीमेपर्यंत सुरू असलेल्या चार पदरी मार्गिकेशी या प्रकल्पाची सांगड घातली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील औद्योगिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

Nashik Solapur Akkalkot | प्रवासाचा वेळ, खर्च आणि अपघातांमध्ये मोठी घट :

या सहा पदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड महामार्गाचा मुख्य उद्देश म्हणजे महामार्गाची क्षमता वाढवणे आणि विनाव्यत्यय वाहतूक सुनिश्चित करणे. या प्रकल्पामुळे प्रवासाचे अंतर सुमारे 201 किलोमीटरने कमी होणार असून, प्रवासाचा वेळ अंदाजे 17 तासांनी घटणार आहे. सरासरी ताशी 60 ते 100 किलोमीटर इतक्या डिझाइन स्पीडमुळे प्रवासी आणि मालवाहू वाहनांना अधिक सुरक्षित आणि जलद प्रवास करता येणार आहे.

क्लोज टोलिंग प्रणालीमुळे वाहतुकीत थांबे कमी होतील, इंधन खर्चात बचत होईल आणि अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईल. यासोबतच कोप्पर्थी आणि ओरवाकल या नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या प्रमुख नोड्सपर्यंत जाणाऱ्या मालवाहतुकीची लॉजिस्टिक क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. (Greenfield Expressway)

रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना :

या महाप्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीच्याही मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या मार्गिकेच्या बांधकामातून सुमारे 251 लाख मनुष्य-दिवसांचे थेट रोजगार आणि 313 लाख मनुष्य-दिवसांचे अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे नाशिक(Nashik), अहिल्यानगर(Ahilyanagar), धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. (Nashik Solapur Akkalkot Corridor)

महामार्गालगत औद्योगिक वसाहती, लॉजिस्टिक हब आणि सेवा क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता असून, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात हा प्रकल्प निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

News Title : Nashik-Solapur-Akkalkot Corridor Approved: Travel Time Slashed to 14 Hours with ₹19,000 Cr Boost

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now