Vat Purnima | उद्या वटपौर्णिमेचा पवित्र सण देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. पतीच्या दीर्घायुष्याची आणि अखंड सौभाग्याची कामना करत विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करून सावित्री व्रत पाळतात. हिंदू धर्मात या व्रताला विशेष महत्त्व असून ते श्रद्धा, शुद्धता आणि धार्मिक नियमांचे पालन करून करण्याची परंपरा आहे. मात्र, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये काही महिलांनी हे व्रत आणि पूजा टाळावी, अशी धार्मिक मान्यता सांगितली जाते.
कोणत्या महिलांनी वटपौर्णिमेची पूजा टाळावी? :
धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक परिस्थितीत वटपौर्णिमेची मुख्य पूजा करणे योग्य मानले जात नाही. काही विशेष अवस्थांमध्ये महिलांनी वडाच्या झाडाची पूजा तसेच प्रदक्षिणा टाळावी, असे शास्त्रात नमूद केले जाते. असे न केल्यास व्रताचे अपेक्षित फळ मिळत नाही, अशी श्रद्धा आहे.
मासिक पाळी सुरू असलेल्या महिलांनी या काळात वडाच्या झाडाला स्पर्श करू नये, पूजा करू नये किंवा प्रदक्षिणा घालू नये, अशी धार्मिक मान्यता आहे. त्याचप्रमाणे घरात नुकताच जन्म किंवा मृत्यू झाल्यामुळे सुतक अथवा सुवेर सुरू असल्यास शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुख्य पूजा टाळण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी व्रताचे पालन करता येऊ शकते, मात्र वडाच्या झाडाला किंवा पूजावस्तूंना स्पर्श करणे वर्ज्य मानले जाते.
Vat Purnima | गर्भवती आणि आजारी महिलांसाठी विशेष सूचना :
ज्या महिला गंभीर आजाराने त्रस्त आहेत, नियमित औषधोपचार घेत आहेत किंवा शारीरिकदृष्ट्या अत्यंत अशक्त आहेत, त्यांनी कठोर उपवास आणि कडक उन्हात वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालणे टाळावे. शरीराला अनावश्यक त्रास होईल अशा प्रकारे केलेली पूजा करण्यापेक्षा आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मानले जाते.
गर्भवती महिलाही वटपौर्णिमेचे व्रत करू शकतात. मात्र त्यांनी वडाच्या झाडाभोवती सात किंवा त्यापेक्षा अधिक प्रदक्षिणा घालणे टाळावे. गर्भावस्थेत दीर्घकाळ उभे राहणे किंवा गर्दीत वारंवार फेऱ्या मारल्याने चक्कर येण्याचा अथवा गर्भावर ताण पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी शांतपणे एका ठिकाणी बसून श्रद्धेने पूजा करणे अधिक योग्य मानले जाते.






