Who is Suraj Chavan | लातूरमध्ये छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना जबर मारहाण झाली. ही मारहाण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आता “सूरज चव्हाण नेमके कोण आहेत?” असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. (Who is Suraj Chavan)
सूरज चव्हाण कोण आहेत? :
– सूरज चव्हाण हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत.
– ते अजित पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
– एकत्रित राष्ट्रवादीमध्ये त्यांनी युवक कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती.
– सूरज चव्हाण हे लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळचे रहिवासी आहेत.
– २०१९ मध्ये अजित पवारांनी पहाटे शपथ घेतल्यानंतर आमदारांना परत आणण्यात सूरज चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्याच रांगेत अजित पवार यांच्यासोबत उभं राहणाऱ्यांमध्ये सूरज चव्हाण आघाडीवर होते.
मारहाण प्रकरणाची पार्श्वभूमी काय? :
लातूरमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांचा विधानसभेत रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत निवेदन देण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांनी प्रतिकात्मक पद्धतीने तटकरे यांच्या टेबलावर पत्ते टाकले, यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते चिडले आणि संतप्त जमावाने विजय घाटगे यांना मारहाण केली.
साक्षीदार आणि व्हिडीओ फुटेजनुसार, सूरज चव्हाण (Suraj Chavhan) यांनी स्वतः कोपर आणि बुक्क्यांनी छावा कार्यकर्त्याला मारहाण केली. हा प्रकार पत्रकार परिषदेनंतर दुसऱ्या हॉलमध्ये घडला. छावा कार्यकर्ते शांतपणे पत्रकारांशी बोलत असतानाच ५०-६० लोकांचा जमाव तिथे आला आणि अचानक हल्ला केला आहे.






